Sowing has begun in Chakur taluka.
चाकूर, पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने मान्सूनपूर्व हजेरी लावल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस अधिक होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून तालुक्यात पेरणीला सुरू होऊन गती आलेली आहे.
चाकूर तालुक्यात आजपर्यंत ४७८ मि. मी. पाऊस झाला आहे. सद्या खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी बांधावर असून पेरणीची लगबग पहायला मिळत आहे. तालुक्यामध्ये खरिपाचे पेरणीयोग्य क्षेत्र ऊसासह ५९९०९ एवढे आहे. ५९९०९ क्षेत्रापैकी ८९६७एवढा तर १४ टक्के आजपर्यंत सोयाबीनचा पेरणा झाला आहे. यावर्षी मृग निघण्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कधी पेरण्या करायच्या याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
रान वापसाया नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस उशीर केला आहे. मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच जून महिन्यातील मागील काही दिवसांत झालेला पाऊस यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सध्यातरी सुरुवात केली आहे.
आजपर्यंत चाकूर तालुक्यात सोयाबीन ७४२९ हेक्टर्स, तूर ११७२ हेक्टर्स, मूग १७८ हेक्टर्स, उडीद १०२ हेक्टर्स, खरिप ज्वारी ७८ हेक्टर्सवर पेरा झालेला आहे. सोयाबीन पीक हे नगदी पीक असल्यामुळे सोयाबीन पिकाची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. यंदाही सोयाबीन पेरा अधिक होईल असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
निसर्ग साथ देईल, शेतीत भरपूर उत्पन्न होईल या आशेवर शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तालुक्यातील चाकूर, हणमंतवाडी, शेळगाव, मशनेरवाडी, चापोली, जानवळ, वडवळ, नळेगाव, रोहिणा, आनंदवाडी, सरणवाडी भागात पेरणीला प्रारंभ झाला आहे.