

देवणी : यंदा हवामान खात्याचे पावसाचे अंदाज दिलासादायक ठरत असतानाच, देवणी तालुका प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. थेट बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पेरणीत सहभाग घेतला.
देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी स्वतः चाड्यावर मूठ धरून पेरणी करत, शेतकऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा आणि प्रशासनाची कटिबद्धता अधोरेखित केली.
सध्याच्या युगात शेतीत यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत आणि पेरणीला प्राधान्य देत असले तरी, काही शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने शेतीची कामे करतात. बोंबळी (खुर्द) येथे दिव्यांगांना मदतीचे वाटप करून कार्यालयाकडे परतत असताना, वाटेत सुरू असलेली पारंपरिक पेरणी पाहून या अधिकाऱ्यांनाही आपल्या मातीशी जोडलेल्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्यांनी पेरणी करण्याचा मोह आवरवला नाही.
या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष पेरणीत सहभाग घेत सोयाबीनचे बी पेरले. त्यांच्या या कृतीने केवळ शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला नाही, तर संपूर्ण तालुक्याला 'पेरते व्हा' असा एक सकारात्मक संदेश दिला. आधुनिक काळातही पारंपरिक शेतीपद्धतीचे महत्त्व आणि त्यातील आपलेपणा जपण्याचा हा प्रयत्न होता. प्रशासकीय अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांच्या कामात सहभागी झाल्याने, शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी नवीन उमेद मिळाली असून, खरीप हंगामाची सुरुवात उत्साहात झाली आहे.