Sambhaji Patil Nilangekar pudhari photo
लातूर

Sambhaji Patil Nilangekar | राहुल गांधींकडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : निलंगेकर

एसआयआरच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

लातूर : एसआयआरच्या प्रक्रियेवरून राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना तीनही निवडणूक आयुक्तांनी उत्तर देत त्यांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ खोडून काढला आहे. संविधानाचे पुस्तक हातात घेऊन राहुल गांधी संवैधानिक संस्था, न्यायालय आणि लोकशाहीवर आरोप करीत असून, या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.

एसआयआरच्या प्रक्रियेबाबत विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणूक आयुक्तांनी त्याला योग्य उत्तर दिले असतानाही काँग्रेसकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले जात आहे. एसआयआरची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे निलंगेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसकडून यापूर्वीही संवैधानिक संस्था, लोकशाही आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा दावा निलंगेकर यांनी केला. संविधानाचे पुस्तक हातात घेऊन त्याच संविधानाच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर आरोप करणे विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले.निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या एसआयआर प्रक्रियेला न्यायालयानेही वैध ठरविले असताना आयोगावर मनमानी कारभाराचा आरोप करणे हास्यास्पद आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले.

काँग्रेस जिंकलेल्या राज्यांमध्ये निवडणूक आयोग चांगला आणि भाजप जिंकलेल्या राज्यांमध्ये ईव्हीएम व आयोगावर आरोप, अशी भूमिका काँग्रेस घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी संवैधानिक संस्था आणि न्यायव्यवस्थेला लक्ष्य केले जात आहे. देशातील जनता राहुल गांधींच्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला भीक घालणार नाही, असा विश्वासही निलंगेकर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT