चाकुरात धक्कादायक घटना : बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला file photo
लातूर

चाकुरात धक्कादायक घटना : बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला

पोलिसांकडून दुसऱ्या मुलाची शोधमोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Shocking Incident in Chakur: Body of One of Two Missing Boys Found

चाकूर, पुढारी वृत्तसेवा :

येथील दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यापैकी एका बालकाचा मृतदेह आढळून आल्याने चाकूर व परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी १९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७ वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातील साईचरण दिनेश स्वामी (वय १०) आणि देवांश मंगेश स्वामी (वय ७) ही दोन्ही मुले घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेल्याचे निदर्शनास आले. दुपारी १ वाजता ही बाब पोलिसांना कळविण्यात आली.

माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून शोधकार्य सुरू केले. दुपारी सुमारे २ वाजून १० मिनीटांनी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. त्याचदरम्यान, बेपत्ता मुलांपैकी देवांश मंगेश स्वामी (वय ७) याचा मृतदेह चाकूर-उजळंब रस्त्यालगत एका जुन्या, पडक्या घराजवळील मोकळ्या जागेत आढळून आला.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या प्रकरणाच्या तपासासाठी चाकूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करण्यात आली असून, बेपत्ता दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू आहे. तसेच फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीने मृत्यूचे नेमके कारण आणि संभाव्य आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे चाकूर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT