Shocked by husband's death; wife also passes away
बेलकुंड, (ता. औसा) पुढारी वृत्तसेवा: लग्न हे साताजन्माचे बंधन असते आणि सुख-दुःखात एकमेकांचे सोबती राहायचे असते, ही म्हण औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील एका वृद्ध दाम्पत्याने खरी करून दाखवली आहे. शुक्रवारी सकाळी पतीचे निधन झाले आणि सायंकाळी ही वार्ता कळताच पतीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या पत्नीनेही आपले प्राण सोडले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. रेवा खेमा जाधव (वय ८५) आणि धानाबाई रेवा जाधव असे या रेवा जाधव दाम्पत्याचे नाव आहे. एकंबी तांडा येथील ज्येष्ठ नागरिक रेवा जाधव यांचे शुक्रवारी (दि. २४) सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. रेवा जाधव यांच्या पत्नी धानाबाई या मागील १० वर्षांपासून आजारी होत्या. या दीर्घ आजारपणाच्या काळात रेवा जाधव यांनी आपल्या पत्नीची अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने सेवा केली होती. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी पत्नीची साथ सोडली नाही.
मात्र, नियतीचा खेळ विचित्र असतो. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जेव्हा धानाबाईंना पतीच्या निधनाची बातमी देण्यात आली, तेव्हा त्या कोसळल्या. ज्यांनी आजारपणात माझी आईप्रमाणे सेवा केली, तेच सोडून गेल्यावर मी तरी कशी जगू? या धक्क्याने आणि पतीच्या विरहाने त्यांचीही प्राणज्योत मालवली.
प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक
आजच्या काळात नात्यांमधील वीण सैल होत असताना, रेवा आणि धानाबाई जाधव यांचे उदाहरण समाजासाठी आदर्श ठरले आहे. पत्नी आजारी असताना सेवा आणि पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने सोडलेले प्राण, हे प्रेम आणि निष्ठेचे एक दुर्मिळ उदाहरण असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.