

Latur News: Boycott of voting due to lack of a road
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही साध्या पक्क्या रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासकीय अनास्थेचा निषेध म्हणून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर पूर्णतः बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. "जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान नाही" असा पवित्रा घेत गावकऱ्यांनी गावच्या मुख्य रस्त्यावर आणि घराघरांवर बहिष्काराचे बॅनर लावून संताप व्यक्त केला आहे.
ब्रह्मवाडी ते मोघा (ग्रामीण मार्ग ४२) हा साधारण २ ते ३ किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यानंतर या रस्त्याचे केवळ एकदाच डांबीकरण झाले होते. त्यानंतर गेल्या अनेक दशकांत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. रस्ता पूर्णपणे उखडल्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे आणताना आणि शेतमाल बाजारात नेताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्याअभावी गावात रुग्णवाहिका किंवा खासगी वाहने वेळ वर येत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखल तुडवत पायपीट करावी लागते. निवडणुका आल्या की राजकीय नेते मतांसाठी गावात येतात आणि रस्ता करण्याचे आश्वासन देतात.
मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर पाच वर्षे या गावाकडे कोणीही फिरकत नाही, असा अनुभव ग्रामस्थांनी बोलून दाखवला. वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी सामूहिक बैठकीत निवडणुकीवर बहिष्काराचा एकमुखी ठराव मंजूर केला. गावकऱ्यांनी केवळ ठराव करूनच थांबले नाहीत, तर संपूर्ण गावात निषेधाचे वातावरण आहे. गावच्या प्रवेशद्वारावर, सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्येक घरासमोर निवडणुकीवरील वहिष्काराचे फलक झळकत आहेत.
खराब झालेल्या रस्त्याच्या मध्यभागीच बॅनर लावून प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम ग्रामस्थांनी केले आहे. प्रशासकीय अधिकारी मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
आम्ही आमचा निर्णय प्रशासनाला कळवला आहे. अधिकारी आता पुन्हा आश्वासन देत आहेत, पण पोकळ आश्वासनांना आम्ही आता भुलणार नाही. आधी प्रत्यक्ष रस्ता व्हावा, मगच आम्ही मतदानाचा विचार करू, असे ग्रामस्थांनी सांगितले.