Latur Rain News : औसा तालुक्यावर दुष्काळाचे सावट file photo
लातूर

Latur Rain News : औसा तालुक्यावर दुष्काळाचे सावट

दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर टांगती तलवार; उगवलेली कोवळी पिके करपण्यास सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

Shadow of drought over Ausa Taluka

औसा, पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही औसा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची उगवण कमी झाली असून अनेक ठिकाणी नुकतीच उगवलेली कोवळी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात अनेक भागांत जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला असून कडक ऊन व कोरड्या वाऱ्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून बियाणे, खते आणि मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पुन्हा पेरणी करावी लागल्यास आर्थिक भार अधिक वाढणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

तावरजा धरणासह परिसरासह अनेक लहान-मोठ्या जलस्रोतांतील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. त्यामुळे खरीपाबरोबरच पशुधनासाठी पाण्याची चिंता वाढू लागली आहे. हवामान विभागाने लवकरच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी प्रत्यक्ष पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने औसा तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

जुलैच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या पावसामुळे पेरण्यांना गती मिळाली असली, तरी अद्याप तालुक्यात केवळ 57.20 टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात सुमारे 96845.76 हेक्टर क्षेत्रापैकी 55397 हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सोयाबीन हे प्रमुख पीक असून त्याची सर्वात जास्त 50191 हेक्टर्सवर त्याखालोखाल तूर, मूग, उडीद आणि ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र अनेक गावांमध्ये अद्याप पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. औसा महसूल मंडळासह लामजना भादा, मातोळा, किल्लारी, बेलकुंड, किनीथोट आणि उजनी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीकामांवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, पेरणीनंतर काही भागांत सोयाबीनची अपेक्षित उगवण झाली नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घाईघाईने दुबार पेरणी न करता पावसाची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, तसेच कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पिकांचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले आहे. तालुक्यात लवकरच दमदार पाऊस होऊन खरीप हंगाम वाचावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

कृषी विभागाने या तक्रारींची दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीनंतर शेताची नियमित पाहणी करण्याचे, उगवण कमी असल्यास तातडीने कृषी सहायक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरणीही वेगाने पूर्ण होईल.
- दत्तात्रय हाके, तालुका कृषी अधिकारी, औसा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT