लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा वेतन घोटाळा File Photo
लातूर

Latur News : लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा वेतन घोटाळा

वार्षिक तपासणीत फुटले बिंग; पीएसआयसह चौघांवर गुन्हा, तिघे पोलिस कोठडीत

पुढारी वृत्तसेवा

Salary Scam Worth ₹2.38 Crore at Latur Superintendent of Police Office

लातूर : पुढारी वृत्तसेवा

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेत तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कार्यालयातीलच चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. न्यायालयाने यातील तिघांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहुल गोविंदराव वागदरे (लिपिक), ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षीरसागर आणि पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाची २०२५ ची वार्षिक तपासणी केली असता, वेतन वितरणात अनियमितता दिसून आली होती. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी हे प्रकरण गांभीयनि घेत चौकशी समिती नेमली.

प्राथमिक चौकशीत मे २०१५ ते मार्च २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार केली. प्रोत्साहन भत्ता, मूळ वेतन थकबाकी, विशेष वेतन अशा विविध शीर्षकांखाली अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम काढून ती स्वतःच्या बँक खात्यावर वळवल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक तांबे यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठवला होता, त्यास मंजुरी मिळताच गुन्हे दाखल करण्यात आले.

१० वर्षांपासूनचे काळेबेरे रडारवर साधारणपणे पोलीस आणि निवृत्ती वेतनधारकांचे पगार एकत्रितपणे अधीक्षक कार्यालयात येतात. रक्कम शिल्लक राहिल्यास ती शासनाला परत करणे बंधनकारक असते. मात्र, आरोपींनी खोट्या कारणांचा आधार घेत ही रकम हडपली. विशेष म्हणजे, दरवर्षी वार्षिक तपासणी होत असतानाही दहा वर्षे हा प्रकार कोणाच्या लक्षात का आला नाही? यात आणखी कोणाचे संगनमत आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिह साळवे यांच्या तपासातून समोर येतील

प्रकरणाची पारदर्शक चौकशी सुरू प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी सुरू असून, यात दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.
अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT