Crime News pudhari photo
लातूर

Latur Crime : मारहाण करीत दोन कारमधील प्रवाशांना साडेतीन लाखांना लुटले

राष्ट्रीय महामार्गांवरील घरणी - मोहदळ पाटीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी मोहदळ पाटीजवळ २० ते २५ वर्षे वयातील चार दरोडेखोरांनी दोन कारला अडवून प्रवाशांना मारहाण करीत कारमधील महिलांच्या सोन्याच्या दागिन्यासह एकूण तीन लाख ४७ हजार २५० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी २० रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. घरणी येथील महामार्ग पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अशा घटनामुळे महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लातूर येथील खडक हनुमान मंदिराजवळ येथील रहिवाशी कांताप्रसाद तापडीया हे कारने एमएच-२४, बीएल- ०६०० कुटुंबीयासह लातूरकडे येत असताना घरणी आणि मोहदळ पाटीजवळ दरम्यान कारखाली काहीतरी आवाज आल्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. तेव्हा पाठीमागून अचानक चार अनोळखी तरुण कारजवळ आले व कारमधील महिला व पुरुषांना मारहाण करण्यास सुरवात केली.

यात कांताप्रसाद यांच्या पत्नी सीमा तापडीया, बहीण अलकनंदा बियाणी, मुलगी स्नेहा यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, बांगड्या, चेन, लॉकेट व इतर सोन्याचे दागिने असा दोन लाख ८३ हजार २५० रुपयांचा ऐवज लुटला.यावर चोरटे न थांबता याच दरम्यान कार एम एच ४० सीक्यू ६४८१ मधील प्रवाशांनाही दरोडेखोरांनी लुटले. त्यांच्या कुटुंबीयांकडील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ६४ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.

या घटनेमुळे चाकूर तालुक्यासह परिसरात भीती व्यक्त केली जात आहे. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी कांताप्रसाद तापडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि श्रीकांत शेंडगे हे करीत आहे.चौकट :पहाटेच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या लुटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT