Walk for Water : तीन किलोमीटर चालत लातूरकरांनी दिला जलसंवर्धनाचा संदेश file photo
लातूर

Walk for Water : तीन किलोमीटर चालत लातूरकरांनी दिला जलसंवर्धनाचा संदेश

'वॉक फॉर वॉटर'मधून जलसंधारणाचा जागर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

Residents of Latur walked three kilometers to spread the message of water conservation

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित 'महा वॉकथॉन वॉक फॉर वॉटर'मध्ये लातूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा' चा संदेश देत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रांगण ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे तीन किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात आला.

जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला सुरुवात केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथही देण्यात आली. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे आणि भूजल पुनर्भरणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पुढील पिढीसाठी माती आणि पाणी जपणे ही काळाची गरज असून, मृद व जलसंधारणाच्या कामात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

युवक-युवती, खेळाडू, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटांतील नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनीही तीन किलोमीटरचे अंतर पायी पूर्ण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT