Renapur Zilla Parishad school bus runs on only eight teachers
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन मजली शाळेत सध्या केवळ सव्वाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा गाडा आठ शिक्षक चालवितात. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची व्यवस्था तसेच वॉचमनचा पगार हा मुख्याध्यापक व शिक्षकांनाच स्वतःच्या पगारीतून करावा लागतो. शिक्षकांना दरवर्षी घरोघरी जाऊन विद्यार्थी जमा करावे लागतात.
१९७० पूर्वी श्री रेणुका देवी मंदिरात जिल्हा परिषदेची शाळा भरत होती. त्यानंतर शहरापासून एक किमी अंतरावर २६ वर्गखोल्या असलेल्या दोन मजली भव्य इमारतीमध्ये शाळा भरू लागली. १९८५ पर्यंत या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यानंतर खाजगी शाळां सुरू झाल्यामुळे या शाळेत मुलांची संख्या रोडावू लागली.
शाळेतील विद्यार्थी वाढले पाहिजेत, शाळा व शिक्षक टिकले पाहिजेत यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सारणीकर यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने स्वनिधीतून पिण्याच्या पाण्याची सोय केली, मुलांना शाळेत आणण्यासाठी एका वाहनांची व्यवस्था केली, सांडपाणी व वॉचमन याचा सर्व खर्च मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्वतःच्या पगारातूनच करीत आहेत. शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून शासन विविध योजना राबवित आहे परंतु पटसंख्या वाढत नाही.
पटसंख्या वाढविण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागते. शाळेत स्वच्छतागृहाची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिक्षकांनाच करावी लागते. पुरेसे कर्मचारी नाहीत, पाणी साठविण्याची व्यवस्था नाही. शाळा व शिक्षक कायम राहवेत यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्वःचे पैसे खर्च करतात.
२०२३ - २४ या वर्षात शाळेत अवघे १०९ विद्यार्थी होते. इंग्रजी व खाजगी शाळांमुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाली, ती वाढविसाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्नशील आहोत. सध्या १ ली ते ५ वी मध्ये २६, ६ वी ते ८ वी मध्ये - ४४, ९ वी ते १० वी मध्ये ५४ असे एकूण १२४ मुलं - मुलीं शाळेत शिकत आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी मुलांना इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी "व्यक्ती चरित्र "व इतर उपक्रम राबविले जात आहेत. शाळेसमोर रोड ब्रेकर असावेत.- वैशाली सारणीकर, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा रेणापूर.