Pangaon Vimal Agro Sugar Factory  pudhari photo
लातूर

Pangaon Vimal Agro Sugar Factory : सहा दिवसांनंतर पानगावचा साखर कारखाना सुरू

ऊसवाहू ट्रॅक्टर गाळपाविना उभे; शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची दखल

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर: पानगाव येथील विमल अॅग्रो कंपनीचा साखर कारखाना तब्बल सहा दिवसांच्या खंडानंतर बुधवारी (दि. २८) सुरू झाला. कारखान्यासमोर २२ ऑक्टोबरपासून उसाने भरलेले शंभरावर ट्रॅक्टर गाळपाच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर जाऊन तातडीने गाळप सुरू करण्याची मागणी केली. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने दखल घेत कारखाना सुरू केला.

गेल्या सहा दिवसांपासून ऊसवाहू वाहने उभी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची भीती होती. काही शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनातही घट झाल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वाहनांचे वजन करून पावत्या देण्यात आल्या. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी कारखाना तातडीने सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर कार्यकारी संचालकांनी दखल घेत बुधवारी काही तासांतच गाळप सुरू केले.

यंत्र बिघाडामुळे कारखाना बंद

कारखाना बंद असण्याबाबत विमल अॅग्रो कंपनीच्या कार्यकारी संचालकांशी संपर्क साधला असता, यंत्रसामग्रीचे काही भाग वारंवार खराब होत असल्याने कारखाना बंद पडत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची अडचण आणि यंत्रातील बिघाडामुळे कारखाना बंद-चालू होत होता. शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन कमी होऊन नुकसान होऊ नये, यासाठी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे वजन करून ऊस गव्हाणीशेजारी उतरवून घेण्यात आला. यापुढे कारखाना सुरळीत सुरू राहण्यासाठी विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT