Renapur theft cases increase : रेणापूर तालुक्यात चोरी, लुटीच्या घटनांमध्ये वाढ Pudhari
लातूर

Renapur theft cases increase : रेणापूर तालुक्यात चोरी, लुटीच्या घटनांमध्ये वाढ

नागरिक धास्तावले, गुरांच्या चोऱ्याही थांबेनात

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर : गेल्या दोन वर्षांपासून रेणापूर तालुक्यातील शेतकरी आणि रहिवासी सतत चोरी, लुटी आणि घरफोड्याच्या घटनांचा सामना करत आहेत. विशेषत: दिवसा रस्त्यावर एकट्याला गाठून लुबाडण्याच्या घटनांत वाढ झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण परसले आहे.

शेताकडून घराकडे येत असलेल्या एका शेतकऱ्याच्या तोंडावर फुंकर मारून त्याच्या हातातील दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना रेणापूर पिंपळफाटा ते उदगीर रोडवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वीही शेतकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांना लुटण्याच्या , घरात घुसून चोरी व जनावरे चोरण्याच्या घटना घडल्याने नागरीक धास्तावले आहेत. यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांवर रस्त्यात हल्ला करण्यात आला होता.

बापूसाहेब कुलकर्णी यांच्यावर रेणापूरकामखेडा रोडवर दुचाकीस्वारांनी गळ्याला चाकू लावून त्यांची एक तोळ्याची अंगठी काढली होती. त्यानंतर नवनाथ गोविंदपूरे हे शेतकरी शेताकडे जात असताना रेणापूर - पानगाव रोडवर घनसरगाव पाटीजवळ दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांच्या हातातील 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेवून चोरटे पसार झाले होते.

अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावचे आपेट यांच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांच्याजवळ असलेली 70 हजारांची पिशवी घेऊन पोबारा केला. त्यानंतर रेणापूरचे शत्रुघ्न पाटील हे शेताकडे असताना त्यांच्याही तोंडावर स्प्रे मारून चोरट्यांनी त्यांच्या हातातील 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी पळवली. त्यानंतर पुढे अशीच घटना पिंपळफाटा - रेणापूर - उदगीर रोडवर घडली. रेणापूरचे रहिवासी संदीपान शिंदे यांच्या तोंडावर फुंकर घातली त्यात शिंदे यांना भुरळ आल्याने त्यांच्या हातातील दहा ग्रॅमची अंगठी चोरट्यांनी काढून घेऊन पोबारा केला. सध्या महिलांवरही अशाच प्रकारच्या हल्ल्यांची नोंद आहे.

शेलू जवळगा पाटीजवळ एकुरके महिलेसोबतही चोरी घडली, जिथून त्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढले.घरफोड्याच्या घटनाही कमी नाहीत. मोटेगावमधील माऊसाहेब सूर्यवंशी यांच्या घरातून 25 हजार रुपये, कुसुम कोरडे यांच्याकडून चार तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोख रक्कम, बालासाहेब शिंदे यांच्याकडून चार तोळे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपये, तसेच धोंडीराम भिसे यांच्याकडून तीन तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये चोरीस गेले आहेत.

  • शेतात बोधलेली जनावरे चोरीला जाण्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांचा असा विश्वास आहे की, सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे चोरटे अधिक धोकादायक झाले आहेत आणि दिवसादेखील हल्ले करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याची आणि नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नागरिकांनी शक्य तितकी काळजी घेऊन, एकट्याने रस्त्यावर न जाणे, जास्त सोन्याचे दागिने न घालणे व संशयास्पद व्यक्तींविषयी तातडीने पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT