Shri Renuka Devi : 'आई राजा उदो उदो', 'रेणुका माता की जय'चा जयघोष file photo
लातूर

Shri Renuka Devi : 'आई राजा उदो उदो', 'रेणुका माता की जय'चा जयघोष

रेणुका देवी मंदिरात उत्साहात घटस्थापना : मान्यवरांच्या हस्ते महापूजा; नवरात्रोत्सवात रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर

पुढारी वृत्तसेवा

Renapur Shri Renuka Devi Navratri Festival

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूरचे ग्रामदैवत आदिशक्ती श्री रेणुका देवी मंदिरात रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि 'आई राजा उदो उदो', 'रेणुका माता की जय'च्या जयघोषात उत्साहात घटस्थापना करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार तथा देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रशांत थोरात, अप्पर तहसीलदार संदीप पाटील व त्यांच्या पत्नी अपर्णाताई पाटील, आमदार रमेशअप्पा कराड यांच्या पत्नी संजीवणीताई कराड आणि मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष राम पाटील यांच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराचे पुजारी राजू धर्माधिकारी यांनी पौरोहित्य केले.

श्री रेणुका देवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या दहा दिवसांत विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना देवीचे चोवीस तास दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर ट्रस्टने व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी रांगा, सभामंडप आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात १४ ते १९ ऑक्टोबरदरम्यान श्री रेणुका देवी मंदिर ट्रस्ट, सेवाभावी ब्लड बँक आणि खासगी दवाखान्यांच्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पाच पोलीस अधिकारी, ३५ पोलीस कर्मचारी, ५३ होमगार्ड, १५ महिला पोलीस कर्मचारी आणि १५ महिला होमगार्डचा समावेश आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

विजयादशमीला, २० ऑक्टोबर रोजी देवीच्या पालखीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री नऊ वाजता मंदिर परिसरात शोभेच्या दारूची आतषबाजी होईल. पालखी गावाच्या दक्षिणेकडील तुकाई देवी मंदिरात जाणार असून, विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. घटस्थापनेच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, औशाचे तहसीलदार घनश्याम अडसूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल कॅगले, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, मंडळ अधिकारी संजय घाडगे, कमलाकर तिडके, दिलीप देवकते, तलाठी कलीम शेख यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

रेणापूरची रेणुका देवी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रात विविध गावांतील भाविक पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरासमोरील सुमारे ५० फूट उंचीची 'हलती दीपमाळ' हेही भाविकांचे आकर्षण आहे. दीपमाळ हलविल्यानंतर ती डोलताना दिसत असल्याने हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी होते. मंदिरात पहाटेपासून रात्रीपर्यंत संबळ आणि नगारा वादनाची पारंपरिक प्रथा आजही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT