Renapur city is plagued by garbage
विठ्ठल कटके
रेणापूरः रेणापूर व परिसरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तो एका ठिकाणी संकलित करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. तर बाज-ारातील दुकानदार कचरा चक्क पेटवून देत आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असून गल्ली बोळातील रस्त्यावरील कचरा नाल्यात पडून नाल्या तुंबत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र कचरा व घाण पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे.
रेणापूर शहरात व तांडे वाड्यांमध्ये निर्माण झालेली डेंग्यूसदृश परिस्थिती व डासोत्पत्ती आटोक्यात आणण्यासाठी नगर पंचायतीच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने तातडीने स्वच्छता मोहिम हाती घेऊन डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गटारी व रस्त्यावरील खड्ड्यात घाण पाणी साचून त्यावर डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. कचरा जमा करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे (डंप) रेणापूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. काही भागांतील गटारी कचऱ्याने तुंबलेल्या आहेत त्यात घाण पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. डासजन्य आजारात वाढ झाली आहे. रेणापूर शहरातील कचरा व नालेसफाईसाठी नगरपंचायतीकडे घंटा गाड्यांची व्यवस्था आहे.
परंतु पधरा पंधरा दिवस गावात त्या फिरकत नाहीत. डेंग्यूसदृश किंवा इतर आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी नगरपंचायतच्या आरोग्य निभागाकडून बेटिंग व धूर फवारणी मोहीम, कन्टेनर सर्वेक्षण यांसारख्या उपाययोजनांची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
जानेवारी ते जुलै या महिन्यात बाल रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही बाल रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरात व परिसरात डासोत्पत्ती होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, जर कोणाला ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ, लालसर चट्टे, डेंग्यू किंवा डेंग्यूसदृश रोगांची लक्षणे दिसून आली तर त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन रेणापूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. अनिता अनगुले यांनी केले आहे.
पूर्वी एका खासगी जागेवर कचरा जमा करून जमा केला जात होता. सध्या कचरा व्यवस्थापनासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे शहरातील कचरा जमा करण्याचे काम ठप्प झाले आहे. कचरा कोठे टाकावा हा प्रश्न निर्माण झाला असून योग्य जागेचा शोध घेतला जात आहे.प्रतीक लंबे मुख्याधिकारी नगरपंचायत रेणापूर.