प्रशासनाने रेणा मध्यम प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडीत करताना महावितरणचे कर्मचारी. pudhari photo
लातूर

Rena Dam Water Storage : रेणा धरणात अवघा २२ टक्के जलसाठा

पाणी पिण्यासाठी केले आरक्षित; या घडीस गतवर्षी होता ४० टक्के साठा, बाष्पीभवनाच वेग वाढला

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूरसह तालुक्यातील कांही नळयोजनांना पाणीपुरवठा होणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी याच (जुन) महिण्यांत ४० टक्के पाणीसाठा उपलब्द होता. यंदा मात्र केवळ २२.८२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर व्हटी प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे. गतवर्षीपेक्षा तो निम्म्यानेच कमी झालेला आहे.

येणाऱ्या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला नाही तर तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणात सध्या शिल्लक असलेले पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षीत करण्यात आले असून कांही गावांचा विद्युत पुरवठा पुर्णपणे खंडित करण्यात आला आहे अशी माहिती शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.

एल निनो मुळे या वर्षा पाऊस कमी पडेल असे संकेत दिले जात आहेत. मान्सूनचे आगमनहि लांबलेले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर बनत चालली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणुन तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच आरक्षित करण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा उपसा होणार नाही याची प्रशासनाकडुन सर्वोतोपरी दक्षता घेण्यात आली आहे. पानगाव , भंडारवाडी , कामखेडा व फावडेवाडी या गावांचा विद्युत पुरवठा पुर्णपणे खंडित करण्यात आला आहे.

रेणापूर तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ८१५.४० मि.मि. इतके आहे. गतवर्षी (नोहेंबर २०२२ अखेर ) रेणापूर , पोहरेगाव , पानगाव , पळशी व कारेपूर या महसुल मंडळात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पासह इतर पाझर तलाव व मांजरा ,रेणा नदीवरील बॅरेजेसमध्ये मुबलक पाणीसाठा झाला होता.

रेणा मध्यम प्रकल्पातून तब्बल अकरा वेळा रेणा नदी पात्रात अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. मागील वर्षी भूजल पातळीतहि वाढ झाली होती. यावर्षीच्या जून महिन्याचे दोन आठवडे संपले तरीही पाऊस पडलेला नाही. परिणामी पेरण्याही होऊ शकल्या नाहीत. आठ दहा दिवसांत पाऊस झाला तरच पेरण्या होतील. एल निनो च्या सावटामुळे धरणातील खालावत चाललेली पाणी पातळी चिंता व्यक्त करणारी ठरत आहे.

  • रेणा मध्यम प्रकल्पात ( १७ जून अखेर ) केवळ २२.८२ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. या पाण्यावरच रेणापूर दहा खेडी , पानगाव बाराखेडी , खरोळा पाच खेडी व पट्टीवडगाव सहा खेडी या पाणी पुरवठा योजना अवलंबुन आहेत.शिवाय व्हटी , गरसुळी , सुकणी पाझर तलाव व कारेपूर , खलंग्री , कोष्टगाव , सय्यदपुर , पाथरवाडी , मोरवड हे साठवण तलाव कोरडे पडत असून रेणा नदीवरील रेणापूर बॅरेजेसमध्ये - २.५५ टक्के , खरोळा - २. ०० टक्के , जवळगा - १.०६ टक्के तर ध घनसरगावच्या बॅरेजेसमध्ये १.०४ टक्केच पाणी शिल्लक आहे काही दिवसांनी हेही बॅरेजेस कोरडे पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय ? असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT