विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यात सध्या तीव्र उन्हामुळे तापमानात वाढ होऊन विहिरी व बोअरचे पाणी कमी होत असुन रेणा प्रकल्पातील जलसाठ्यातून दररोज 3.5 मि.मी. पाण्याचे बाष्पीभवन होत असून वीस दिवसात 10 सें.मी.ने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी रेणा प्रकल्पात 53. 41 टक्के जलसाठा उपलब्ध होता.
आता अवघा 46 टक्केच जलसाठा उपलब्ध असल्यामुळे या धरणावरील नळ योजनांनी आतापसूनच पाण्याचे काटेकोर पणे नियोजन करावे, असे आवाहन शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.
कडक उन्हामुळे तालुक्याचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे पाण्याच्या भूजल पातळीमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. या वर्षीच्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता तालुक्याची भूजल पातळी वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु केवळ पिण्याच्या पाण्याचा व काहीअंशी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
तालुक्यातील गेल्या काही वर्षाच्या पर्ज्यन्यमानाची स्थिती पाहता दरवर्षी जनतेला नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तीव्र उन्हामुळे तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. लहान मोठे तलाव, बॅरेजेस व शेततळ्यातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे.
त्यामुळे पुढील काळात एल-निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आतापासूनच रेणा मध्यम प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा अपव्य टाळण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
या वर्षी पावसाने तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प , व्हटी प्रकल्प व लघु प्रकल्पातील जल साठ्यात अपेक्षीत वाढ झाली होती. मात्र कडक उन्हामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
यावर्षी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असून रेणा नदी काढच्या शेतकऱ्यांनी इतरही काही उन्हाळी पिके घेतलेली आहेत. रेणा धरणातून नदीवरील बॅरेजेसमध्ये 12 मार्चला 10 सें.मी.ने दोन दरवाजे उघडून नदीपात्रात 1.5 दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे घनसरगाव, रेणापूर, जवळगा व खरोळा या बॅरेजेसमध्ये मुबलक जलसाठा होता. सध्या रेणापूर बॅरेजेस मध्ये 18 , घनसरगाव - 9 , जवळगा - 18 तर खरोळा - 19 टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा वापर नदी काढच्या दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील ऊसासह इतर पिकांना होतो आहे.
31 मार्च अखेर रेणा प्रकल्पात 10 .98 दलघमी जिवंत पाणीसाठा होता. पाण्याची एकूण टक्केवारी 53 . 41 अशी होती. परंतु 20 दिवसात 10 सें.मी . पाण्याचे बाष्पीभवन होऊन सध्या धरणात 46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावरच अवलंबून असलेल्या पानगाव बारा खेडी, रेणापूर दहा खेडी, पट्टीवडगाव पाच खेडी, खरोळा या नळयोजनांनी आतापासूनच काटकसरीने पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, असे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.