Re-NEET proceeds smoothly in Latur district
लातूर, पुढारी वृतसेवा : रविवार २१ जून रोजी शहर व जिल्ह्यात 'नीट-युजी २०२६' परीक्षा सुरळीत पार पडली. २६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. आहे. १४ हजार १३५ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत पार पडावी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर कडेकोड बंदोबस्त लावण्यात आला होता.
लातूर शहर १९, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि चाकूर तालुक्यातील चापोली येथे प्रत्येकी दोन परीक्षा केंद्र होते. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व गोपनीय साहित्याच्या वाहतुकीसाठी विशेष पोलीस एस्कॉर्टची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर शहरातील नीट युजी परीक्षा केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी शहरातील दयानंद महाविद्यालय, राजर्षी शाहूमहाविद्यालय, कॉक्सिट महाविद्यालय आणि जयक्रांती महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांना भेट दिली.
परीक्षा केंद्रांजवळील गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. बंदोबस्तात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान मोबाईल अथवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवाइतर कोणतीही अडचण आल्यास, तिचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता.