लातूर : गल्लीछाप टपोरी पोर वागतात तसे सत्तेतील अनेक नेते आज वागत आहेत. मुख्यमंत्र्यांचा या नेत्यावरील धाक कमी झाला आहे. महाराष्ट्राच्या एका सुसंस्कृत राजकीय परंपरेला त्यांचे वर्तन छेद देत आहे अशी खंत व्यक्त करीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनता हे वर्तन खपवून घेणार नाही, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी (दि.२७)येथे दिला.
लातूर येथे रुग्णालयात जावून अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांची तुपकर यांनी रविवारी भेट घेतली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. सत्ताधारी असोत की विरोधक शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांवरील हल्ले आता खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. एखाद्या आमदारावर कारवाई झाली तर दुसऱ्याची तसे कृत्य करण्याची हिंम्मत होऊ नये असे वातावरण हवे. तथापि त्यांना सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्यांवर कारवाया , खोटया केसेस होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या नीती विरोधात आजच्या सत्ताधाऱ्यांची वाटचाल सुरू आहे चळवळी संपवण्याचा प्रयत्न होत आहे.
कायद्याचे राज्य संपत चालले आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता असे धोरण सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक मंत्री निष्क्रीय आहेत ते मस्तीत वागत आहेत, त्यांची मगरुरी वाढली आहे, त्यांचा आधार वाटण्याऐवजी त्यांची भीतीच लोकांना वाटत आहे त्यामुळे केवळ कृषिमंत्रीच नव्हे तर अनेक मंत्र्यांचे राजिनामे घेतले पाहीजेत असेही तुपकर म्हणाले. दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनीही विजयकुमार घाडगे यांची रुग्णालयात भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. घाडगे यांच्यावरील हल्ला हा दुर्देवी असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा व ते सोडवण्याचे भान असणारा संवेदनशील कृषि मंत्री महाराष्ट्राला हवा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल आम्ही आता अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पकडे न्याय मागायचा का? अशी खोचक टिकाही तुपकर यांनी यावेळी केली. आजचे सत्तावास्तव छत्रपती शिवरायांनी पाहीले असते तर ते शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून सरकारचा कडेलोटच त्यांनी केला असता असेही तुपकर म्हणाले.