Rangpanchami was celebrated with enthusiasm in Latur city and district
लातूर : पुढारी वृत्तसेवा शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्सहात साजरी करण्यात आली. युवकांसह लहान-थोरांचा या रंगोत्सवातील सक्रीय सहभाग होता. पाण्याचा सुकाळ असूनही त्याचे मोल ओळखत अनेकांनी कोरड्या रंगपंचमीला पसंती दिली. सकाळपासूनच गाव शहरात, गल्लोगल्ली अन् रस्तोरस्ती रंगाची उधळण करणारे लहान थोर दिसून आले.
आपले नातेवाईक, मित्र आदींनी एकमेकांना रंगवून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. होली खेले रघुबीरा अवध में होली खेले रघुबीरा, रंग बरसे, कान्हा नको रे मारू पिचकारी, खेळताना रंग चाई होळीचा अशा अनेक गीतांचा आनंद आपापल्या मोबाईलवरून अनेकांनी घेतला. समाजमाध्यमांवरून तर संगीतमय शुभेच्छा बरसत होत्या. महिला मुलांनीही या रंगोत्सव उत्साहात साजरा केला.
लातूर शहरात चेहरा रंगलेली मुले, मुली अन् बरेच नागरिक आपाल्या बाईक्सवर फेरफटका मारत असलेली दिसत होती. सेल्फी अन् सामूहिक फोटो काढण्यात जणू स्पर्धाच लागली होती. ग्रामीण भागातही या सणांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण आले होते. एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग मारून आनंदात दंग झालेले चित्र सुखावणारे होते.
लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूरः उत्सवाचा आनंद जेव्हा बंचितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतो, तेव्हा त्या सणाचे महत्त्व द्विगुणित होते. याचाच प्रत्यय लातूरमध्ये पाहायला मिळाला. आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची उपस्थिती आणि त्यांचा आजी-आजोबांसोबतचा जिव्हाळा. कार्यक्रमात सहभागी होत जिल्हाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.. आयुष्यातील प्रत्येक रंग महत्त्वाचा असून तो वेगवेगळ्या मानवी भावनांचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी जीवनातील हे सकारात्मक रंग जपले पाहिजेत. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना एकाकी वाटू नये, यासाठी असे उपक्रम समाजातराबवले जाणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या.
लातूर शहर महानगरपालिका उपायुक्त वसुधा फड, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, नायव तहसीलदार गणेश सरोदे, इतिहास अभ्यासक डॉ. विवेक सौतडेकर, संगीत क्षेत्रातील राम बोरगांवकर यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि स्वयंसेवकांनी या रंगोत्सवात सहभागी होत आजी-आजोबांच्या जीवनात आनंदाचे रंग भरले. जिल्हाधिकारी आपल्यासोबत रंग खेळायला आल्या आहेत, हे पाहून आजी-आजोबांचे डोळे पाणावले होते.