देवणी (लातूर) : सतीश बिरादार
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा कालखंड ग्रामीण भागात आजही 'रझाकारांची बारी' म्हणून ओळखला जातो. रझाकारांच्या अन्याय, अत्याचारामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली. रझाकारांनी अनेक गावे जाळली. शेकडो लोकांची हत्या केली अशा कठीण काळात अंतर्गत भागात ही काही बहादूर तरुणांच्या पुढाकाराने अशी केंद्रे उभारली गेली. त्यात सीमावर्ती भागातील आट्टर्गा (तत्कालीन निलंगा तालुका) या गावात सशस्त्र व लढाऊ केंद्र स्थापन करण्यात आले होते.
तरुणांनी रझाकारांशी सशस्त्र लढा देण्यासाठी किसान दलाची स्थापना केली. या किसान दलाचे प्रमुख केंद्र आट्टर्गा, ता. निलंगा (सध्या ता. भालकी, जि. बिदर) हे लहानसे गाव होते. परिसरातील मेहकर, आळवाई, वलांडी, देवणी, घोरवाडी, भालकी, बसवकल्याण या गावात मोठ्या प्रमाणात रझाकारांची केंद्रे स्थापन झाली होती. या गावांमध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्व हिंदूधर्मीय लोक होते. गावाच्या पूर्व बाजूला एका मैलावर मांजरा नदी वाहत होती.
पश्चिमेकडे गावाला लागून अर्धचंद्राकृती दाट सिंदवन होते. यामुळे गावातील लोकांना वेळप्रसंगी लपून बसायला नैसर्गिक जागा उपलब्ध झाली होती. अनेक वेळा या सिंदबनाने टोळीला अडचणीच्या वेळी आश्रय दिला. विशेष म्हणजे पैलवानांचे गाव म्हणून हे गाव ओळखले जायचे. आट्टर्यापासून जवळच मेहकर हे रझाकार केंद्र होते. मेहकरमध्ये पठाण व रझाकारांनी दडपशाहीचे धोरण सुरू केले. यामुळे आर्य समाजाचे कार्यकर्ते व रझाकारात अनेक वेळा वाद निर्माण होत होते. शेरखान व गुलाब शहा हे दोघे या रझाकर केंद्राचे प्रमुख होते. या दोघांची जोडी परिसरातील हिंदू लोकांच्या मनामध्ये धडकी भरवत असे. मेहकर येथील केंद्रात परिसरातील अनेक गावांतील सुमारे एक हजार हत्यारबंद रझाकार सामील झाले होते. या रझाकार व पस्ताकोमांशी आपण लढू शकत नाही असे लोकांना वाटायचे. सर्वसामान्य लोकांना धमकावून खंडणी गोळा करण्याचे काम हे लोक करू लागले.
लोक मूकपणाने हा अन्याय सहन करत होते. आट्टर्गा येथे निवृतीराव गायकवाड, मुरलीधर गायकवाड, विठोबा गायकवाड, यशवंतराव सायगावकर, व्यंकटराव माणिकराव मुळे, (मिरकल) लिंबाजी बिरादार, बळवंतराव मास्तर, ज्ञानू बोळेगावकर, डॉ. चनप्पा तुगावकर, (काळसर तुगाव) भीमराव बिरादार, (मिरकल) शे-षेराव वाघमारे, (निलंगा) दादाराव हालसे, ग्यानोबा बिरादार, आत्माराम मिरखले, लिंबाजी उगले, सिद्राम पाटील, निवृतीराव धनगर, नारायण जाधव, तुकाराम सागावे, रामा बोळेगावे व समस्त गावकऱ्यांनी मिळून किसान दलाची स्थापना केली. स्वतःच्या गावासह परिसरातील अनेक गावांवर रझाकारांचा हल्ला झाला की हे बहादुर तरुण आपल्या प्राणाची पर्वा न करता मदतीला धावून जात. इतर वेळी परिसरातील गावांनी जाऊन आपण करीत असलेल्या कार्याची माहिती देत. रझाकार व पस्ताकोम यांच्याशी संघटितपणे मुकाबला करू असे आश्वासन दिले जाई. यामुळे भयभीत झालेल्या लोकांना यांचा आधार वाटू लागला. या टोळीने रझाकारांच्या विरोधात एकूण पंधरा लढाया झाल्या. त्यातील चौदा लढाया या टोळीतील बहादूर तरुणांनी जिंकल्या.
आट्टर्गा व परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन दिलेला लढा अतिशय रोमहर्षक आहे. या बहादूर तरुणांच्या कार्यामुळे अनेक लोकांचे प्राण व संपत्तीचे रक्षण झाले. आज मात्र हा इतिहास विस्मृतीत जात आहे. त्यामुळे किसान दलाच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेणारा 'क्रांतिकारी किसानदल' हा माहितीपट निर्माण करत असून त्याचे संहिता तयार केली आहे. डिसेंबर महिन्यात या माहितीपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे.भाऊसाहेब उमाटे, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक