Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात घोषणाबाजी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान दोन तरुणांनी काळे रुमाल दाखवून घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतले. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी घोषणाबाजी करणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो."
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहून काळे झेंडे दाखवीत घोषणाबाजी केली. 'ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..., डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी लगेचच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर ते भाषणासाठी उभे राहिले. त्याचवेळी राम पेरकर यांच्यासह काही जणांनी जागेवर उभे राहून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. 'ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..., डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय...' अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी काळे झेंडेही दाखविले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. अशा कार्यक्रमात चार लोक उभे राहुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी घोषणाबाजी करत असतात, हे योग्य नाही मी यावर बोलणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवरही बोलले. "मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुजला आहे, पण तो भूतकाळ करायचा आहे," असं सांगत त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन दिलं. तसेच, कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यासाठी पाणी आणणार असल्याचं आणि सांगली-कोल्हापूरचं पाणी उजनीपर्यंत पोहोचवण्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

