Rain missing for fifteen days; farmers' eyes are on the sky
संग्राम वाघमारे
चाकूर : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील कोवळी पिके कोमेजून जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. चाकूर तालुक्यात आतापर्यंत ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिके जगविण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्प्रिंक्लरचा आधार घ्यावा लागत आहे. कोवळी पिके जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मान्सूनपूर्व पाऊस अधिक झाल्याने जमिनीमध्ये ओलावा चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीची पेरणी केली. ज्या शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली अशा शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांची उगवणही झालेली आहे, मात्र चाकूर तालुक्यामध्ये १५ दिवसांपासून पावसाने दडी दिलेली आहे. यामुळे शेतकरी हवालदिवाल झाला असून शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहेत.
मे महिन्यात तब्बल पंधरा दिवस पाऊस पडला होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याने नद्या नाले भरून वाहिले आणि विहिरीलाही भरपूर पाणी आले. त्यामुळे जमिनीत ओलावा भरपूर प्रमाणात झाला.
दरम्यान मृग नक्षत्राचे आगमन झाले. मृग नक्षत्राचे आगमन होण्यापूर्वीच चाकूर तालुक्यात अधिक पाऊस झाल्यामुळे पेरणी योग्य परिस्थिती निर्माण होवून शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. पेरणीनंतर तब्बल १५ दिवस उलटले तरीही अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. ऊन आणि वाऱ्यामुळे जमीन कोरडी पडली आहे. सध्या सकाळी प्रचंड वारा, सायंकाळी आभाळ येणे आणि दिवसभर ऊन यामुळे जमिनीचा ओलावा झपाट्याने कमी होत आहे.
याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होण्याची भीती असून दोन-चार दिवसात पाऊस पडला तर पिके जगू शकतील. परंतु जास्त काळ पावसाने पाठ फिरवली तर मात्र पिकांना खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केलेली आहे. त्यांच्या शेतात बियाणांची उगवण होणार की नाही. तसेच उगवण झालेल्या पिकांची वाढ व्यवस्थित होईल का नाही याची काळजी आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
चाकूर तालुक्यात आजपर्यंत ४७८ मी मी पाऊस झाला आहे. तालुक्यामध्ये खरिपाचे क्षेञ ५७९३८ एवढे असून ५२४०६ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन ४३८५७ हेक्टर्स, तूर ७५७२ हेक्टर्स, मूग ४४७हेक्टर्स, उडीद २१७ हेक्टर्स, खरिप ज्वारी १७९ हेक्टर्स आणि बाजरी ०५ हेक्टर्स एवढा पेरा इरालेला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करीत पाणी देत आहेत परंतु ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही त्यांना मात्र आभाळाकडे बघण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.