मुरूड (लातूर) : यावर्षी मराठवाड्यावर पावसाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे लहानमोठे धरण व प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागले. मात्र लातूर व धाराशिव जिल्हयाच्या सीमेवर असलेला आणि लातूर तालुक्यासाठी उपयुक्त रायगव्हाण (ता. कळंब) येथील मध्यम प्रकल्प आज पर्यंत भरला नव्हता. परंतु (दि. २२) रोजी मध्यम प्रकल्प परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने मोठ्या वेगाने प्रकल्पामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आणि आज (दि. २३) रोजी पहाटे मध्यम प्रकल्प काठोकाठ भरला. सकाळपर्यंत प्रकल्पाच्या सांडव्यावरून १५ ते २० सेंटीमीटरने पाणी वाहण्यास सुरुवात झाली.
रायगव्हाण मध्यम प्रकल्पामध्ये मुरूडमधून येणारी मुरूडा नदी तसेच माटेफळ (ता. लातूर) व पिंपरी शि. (ता. कळंब) कडून येणाऱ्या मोठ्या ओढ्यांचे पाणी येते. वाठवडा परिसरामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे येथील तलाव भरून सांडव्यावरून वाहू लागला. त्यामुळे रायगव्हाण मध्यम प्रकल्पामध्ये वाठवडा (ता. कळंब) येथून येणाऱ्या पाण्याची भर पडली. दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हा प्रकल्प असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा लातूर जिल्ह्यासाठी होतो.
प्रकल्पाची साठवण क्षमता १२.७०३ दशलक्ष घनमीटर असून आज रोजी शंभरटक्के भरून सांडव्यावरून १५ ते २० सें.मी. पाणी वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर सांडव्यावरून जास्त वेगाने पाणी वाहू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
38 वर्षांत 7 वेळा भरले
प्रकल्पाची उभारणी १९८७ मध्ये झाली तरी या प्रकल्पात दरवर्षी शंभर टक्के पाणीसाठा होत नाही. ३८ वर्षांत प्रकल्प सहा ते सात वेळा भरला आहे. चार वर्षांपासून प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आला नव्हता.
रायगव्हाण धरण क्षेत्रामध्ये अनिश्चित पर्जन्यमान असल्यामुळे धरणाचा पाणीसाठा जवळपास नेहमी मृत पाणीसाठ्यातच असतो त्यामुळे मांजरा धरणातून अतिरिक्त वाया जाणारे पाणी या प्रकल्पात वळवण्यासाठी योजना तत्काळ कार्यान्वित करून धरणात जिवंत पाणीसाठा वाढवावा यासाठी येणाऱ्या काळात परिसर क्षेत्रातील लोकांकडून मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.दादासाहेब वसंतराव काळे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र स्वराज्य पक्ष लातूर