Poor condition of Madansuri-Dhanora road; elected representatives are neglecting the issue
निलंगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मदनसुरी धानोरा रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हे दोन्ही रस्ते दुर्लक्षित राहिले आहेत. परिणामी अनेक अपघात होत आहेत. या भागातील लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे रस्त्यात खड़े की, खड्यात रस्ता अशी अवस्था झाली असून तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
निलंगा तालुक्यातील मदनसुरी ते लिंबाळा जाणारा तीन ते चार किलोमीटर चा रस्ता व धानोरा ते मदनसुरी जाणाऱ्या जवळपास साडे चार किलोमीटर च्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. तसेच कासार सिरसी ते मदनसुरी व निलंगा ते मदनसुरी व निलंगा तर धानोरा मदनसुरी जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित रस्त्यावरून चार ते पाच गार्वाना जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठ-मोठे खड़े पडले आहेत.
या मार्गावर परिवहन महामंडळाच्या बस धावतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. निलंगा ते धानोरा, मदनसुरी परिसरातील नागरिकांसाठी माल वाहतूक किंवा शहराच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे.
मदनसुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून रामतीर्थ, कोकळगाव, कांबलेवाडी, नदीहत्तरगा, सरवडी, हाडोळी, हणमंतवाडीसह अनेक गावचे रुग्ण रुग्णवाहिकेद्वारे व खासगी वाहनाने आरोग्यकेंद्रात येतात. मात्र, रस्ता खराब असल्याने व रस्त्यावर आलेल्या झाडाझुडपामुळे रुग्णांना, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धानोरा ते मदनसुरी जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. विविध कामासाठी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गावरुन ये-जा करावे लागते, मात्र वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन दाखल घेत नाही, त्यामुळे हा रस्ता तात्काळ मंजूर करून रस्त्याचे काम चालू करावे.- अफसर शेख, नागरिक
मदनसुरी ते लिंबाळा या दोन किलोमीटरचे खड्डे बुजावण्याचे आठ लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे. मात्र संबंधित गुत्तेदारांना काम चालू करण्यासाठी सारखं फोन करत असून गुत्तेदार फोनच उचलत नाही. धानोरा ते मदनसुरी हा साडेचार किमी रस्ता असून तो खराब झाला आहे. दोन वेळा रस्ता मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला होता. मात्र मंजूर झाला नाही. आता मार्चमध्ये मंजुरीसाठी पाठवणार आहे.- अनिता पाटील, उप कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग कासार सिरसी
मदनसुरी मार्गे लिंबाळा जाणारा रस्ता हा मृत अवस्थेत असल्यासारखं खराब झालेला आहे. हा रस्ता काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकाळात झालेला आहे. तेव्हापासून हा रस्ता दुरुस्ती झालेला नाही. नुसतं खड्डे बुजून चालणार नाही, तर नवीनच रस्ता करणे गरजेचे आहे.अशोक सूर्यवंशी, सरपंच मदनसुरी