निलंगा, रेणापूर : लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेच्या एका नगराध्यक्षपदासह 23 जागांसाठी व रेणापूर नगरपंचायतीच्या एका नगराध्यक्षपदासह 17 सदस्यांसाठी शनिवारी मतदान शांततेत झाले. निलंगा येथे सरासरी 67.77 टक्के, रेणापूर येथ 80 टक्के मतदान झाले.
निलंगा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी 7 तर 11 प्रभागांत 23 नगरसेवक पदासाठी 87 उमेदवार उभे होते. प्रभागांमध्ये 35 मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आले होते. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. स्त्री मतदारांची संख्या 15 हजार 756, तर पुरुष 16 हजार 429 मतदार आहेत.मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचा संपूर्ण संच विशेष सुरक्षा व्यवस्थेत आपापल्या केंद्रांवर रवाना झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस उपअधीक्षक शरद डुमे पाटील व पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या नियंत्रणाखाली 2 पोलिस निरीक्षक, 3 सहायक पोलिस निरीक्षक, 10 पोलिस कार्यरत होते. मत मोजणी रविवारी तहसील कार्यालय, निलंगा येथे होणार आहे.
रेणापूर नगर पंचायतीच्या मतदानाला सकाळी थंडीमुळे मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनंतर मात्र मतदारांनी प्रत्येक बुथवर रांगा लावल्या होत्या. 11 वाजेपर्यंत विशेष करून मतदानासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. दुपारनंतर मतदानाला गर्दी झाली. प्रभाग 16 मध्ये मतदारांनी मोठी गर्दी केल्याने या ठिकाणी साडेसहा वाजेपर्यंत मतदार सुरु होते.
नगरपंचायतीच्या 17 प्रभागाचे एकुण 16 हजार 277 मतदान होते त्यांपैकी 13 हजार 105 मतदान झाले. एकुण मतदानाची टक्केवारी 80 टक्के झाली. सात वर्षापूर्वी 65 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे याचा फटका नेमका कोनाला बसणार, हे रविवारी कळणार आहे.
प्रभाग निहाय झालेले मतदान असे - प्रभाग एक 1071 , प्रभाग दोन - 850 , प्रभाग तीन - 713 , प्रभाग चार - 983 , प्रभाग पाच - 785 , प्रभाग सहा - 707 , प्रभाग सात - 979, प्रभाग आठ - 678 , प्रभाग नऊ - 558 , प्रभाग दहा - 864 , प्रभाग अकरा - 718 , प्रभाग बारा - 847 , प्रभाग तेरा - 661 , प्रभाग चौदा - 526 , प्रभाग पंधरा - 663 , प्रभाग सोळा - 915 , प्रभाग सतरा - 637 इतके मतदान झाले. उद्या सकाळी 10 वाजता आयटीआय येथे मतमोजणी सुरू होणार आहे.
उदगीरमध्ये 3 जागांसाठी 58 टक्के मतदान
उदगीर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी आणि 37 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन जागी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 8 (अ), प्रभाग क्रमांक 15 (ब) आणि प्रभाग क्रमांक 16 (ब) या तीन जागासाठी 13 मतदान केंद्रांवर शनिवारी 58 टक्के मतदान पार पडले. यात आशाताई यांच्यासह वयोवृद्ध मतदारांना मदत करण्यासाठी व्हीलचेअरसह नगरपरिषद कर्मचारी 130 कर्मचारी पोलिसासह यांची नियुक्ती करण्यात आली होती. या तीन प्रभागातील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.