लातूर जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही file photo
लातूर

Latur News : लातूर जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही

शेतकरी, विद्यार्थी, उद्योजकांना बळ देणे हेच ध्येय : सहकार मंत्री पाटील

पुढारी वृत्तसेवा

Party politics has never been done in Latur District Bank

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पक्षीय राजकारणाला कधीही स्थान दिले नाही. सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजकांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने बँकेची वाटचाल सुरू असून, त्याचमुळे बँकेने यशस्वी प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

शिरूर ताजबंद येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या शाखा इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव होते. बाबासाहेब पाटील म्हणाले, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात सहकारी संस्थांपासून झाली. जिल्हा बँकेचा संचालक झालो तेव्हा बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती.

त्यावेळी दिलीपराव देशमुख यांच्या सहकार्याने वसुली मेळावे घेऊन बँकेला पुन्हा सक्षम करण्यात यश आले. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कोविड काळातही बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आम्ही कधीही चुकीचे काम केले नाही आणि भविष्यातही करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, जिल्हा बँकेने शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजकांना विविध योजनांतर्गत कर्ज उपलब्ध करून त्यांच्या प्रगतीला हातभार लावला आहे. आता दहा गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज मिळावे, यासाठी व्यवस्था केली जात आहे. शेतीसोबत दुग्ध व्यवसायासारखे जोडधंदे स्वीकारल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अधिक वेगाने होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्येष्ठ संचालक अशोक गोविंदपूरकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नेत्यांकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, संचालक अशोक गोविंदपूरकर, शिवानंद हेंगणे, संजय पवार, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव काळे, अय्याज शेख, मुजीब पटेल जहागीरदार,

चंद्रकांत मद्दे, महेश बिल्लापट्टे, निवृत्तीराव कांबळे, मच्छिंद्र वाघमारे, पृथ्वीराज शिरसाट, कार्यकारी संचालक हनुमंत जाधव, अनुप शेळके, व्यंकटराव बिरादार, मारुती पांडे, स्वयंप्रभा पाटील, अनिताकेंद्रे यांच्यासह बँकेचे संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव माने यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT