लातूर : लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततामय, निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तैनात बंदोबस्ताचा सखोल आढावा घेतला. निवडणूक काळात कोणतीही ढिलाई न ठेवता कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
लातूर शहरात डॉमिनंट एरिया पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मिनी मार्केट, गांधी चौक ते गंजगोलाई, सुभाष चौक ते 60 फुटी रोड, विवेकानंद चौक ते महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक ते पीव्हीआर टॉकीज पुढे भामरी चौक,नवीन रेणापूर नाका ते जुना रेणापूर नाका,या प्रमुख मार्गांवर पोलिसांचा ठळक, प्रभावी आणि वर्चस्व दर्शविणारा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर, लातूर ग्रामीण, चाकूर आणि उदगीर तसेच गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी व विवेकानंद चौक या चारही पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्ष फील्डवर उतरून पेट्रोलिंग केली. विविध वेळेत शहरातील आस्थापना विहित वेळेत बंद करून घेतल्या जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेषपथक तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत उपद्रवी, गोंधळ निर्माण करणाऱ्या व संशयास्पद व्यक्तींवर विशेष नजर ठेवली जात आहे. त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास तत्काळ त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
86 व्यक्तींना हद्दपारीच्या नोटिसा
मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने उपद्रवी व समाजात गोंधळ माजविणाऱ्या 86 व्यक्तींना कलम 163 अन्वये हद्दपारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाणे 13, गांधी चौक पोलिस ठाणे 20, एमआयडीसी पोलिस ठाणे 24, विवेकानंद चौक पोलिस ठाणे येथून 29 नोटिसा बजावण्यात आले आहेत. अशा व्यक्तींवर विशेष पाळत ठेवण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे.