Open trade of gutkha and matka in Udgir; where is the police control?
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही उदगीर शहरात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. दुसरीकडे शहरातील गल्लीबोळ, चहाच्या टपऱ्या आणि पानटपऱ्यांवर मटक्याचे आकडे उघडपणे घेतले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असल्याचे सांगितले जाणारे हे अवैध धंदे रोखण्यात पोलिसांना यश का येत नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
भाजी मार्केट, कस्तुरी लॉज परिसर, निडेबन रोड यासह विविध भागांत मटक्याचे अड्डे सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रोजंदारीवरील मजूर, शेतमजूर, रिक्षाचालक आणि तरुण वर्ग मटक्याच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. दिवसाची कमाई मटक्यात गमावली जात असल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या गरजा प्रभावित होत आहेत. मटका चालविणारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना खेळणारे मात्र कर्जाच्या खाईत जात असल्याचे चित्र आहे.
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा उदगीरमध्ये आणला जात असून, तेथून ग्रामीण भागासह जिल्ह्यात वितरण होत असल्याची चर्चा आहे. सीमावर्ती भागाचा फायदा घेऊन हा व्यवसाय सुरू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. गुटख्याची आवक, साठवणूक आणि वितरणाच्या साखळीपर्यंत तपास पोहोचणार का, हा प्रश्न आहे.
कधीतरी छोट्या विक्रेत्यांवर कारवाई होते; मात्र या व्यवसायामागील मोठे सूत्रधार कोण, पुरवठा कुठून होतो आणि जप्त केलेल्या मालाचे पुढे काय होते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
गुटखा-मटका अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचाच अभय असल्याचे उदगीर शहरात सर्रास बोलले जाता आहे. त्यामुळेच हे धंदे बिनधास्त, उघडपणे चालू आहेत. पोलिसांनी ठरवले तर एका दिवसात हे धंदे बंद होतील, मात्र तसे होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत पारदर्शकता असावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिस अधीक्षक लक्ष घालणार का?
या प्रकरणाची लातूरच्या पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांची स्वतंत्र चौकशी करावी. गुटखा पुरवठादार आणि मटका चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे.