Nitin Gadkari : Agriculture is a science; use of technology is necessary to increase production
लातूर, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा असेल, तर शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे अत्यावश्यक आहे. अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हा प्रयोग यशस्वी करण्याची क्षमता आहे. निळकंठेश्वर कारखाना सुस्थितीत आल्यावर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि या भागाची आर्थिक स्थिती निश्चितच सुचारेल, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांनी व्यक्त केला,
औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यांच्या ४२ व्या गळीत हंगामाचा भव्य शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषीरत्न बी. बी. ठोंबरे होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री आ. संभाज ौराव पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजीआ, गोविंद केंद्रे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, मा. खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, गणेश हाके, शिवाजी माने, संताजी चालुक्य, सुरेश बिराजदार, बबन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नितिन गडकरी म्हणाले ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे.
शेती हे एक विज्ञान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याशिवाय उत्पादनात वाढ होऊ शकत नाही. साखर उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू नये; इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन निर्मितीकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे.
शेतकरी ऊर्जा दाता बनल्याशिवाय साखर उद्योगाचे आणि शेतक-यांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही, असे ते म्हणाले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गडकरींनी देशभर चांगले रस्ते बांधले, तर अभिमन्यू पवारांनी मतदारसंघातील शेतरस्त्यांद्वारे विकासाचा मार्ग तयार केला आहे, आ. अभिमन्यू पवार यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आशीर्वाद सदैव आहेत, असे सांगितले. बी.बी. ठोमरे यांनी किल्लारी कारखाना सुरू करणे हे जणू शिवधनुष्य उचलण्यासारखे होते. ते धनुष्य आमदार अभिमन्यू पवार यांनी उचलले. आमचे त्यांना पूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले.
देव, देवेंद्र आणि गडकरीचा आशीर्वाद: आ.पवार
आ. अभिमन्यू पवार यांनी राजकारणात मला नितीन गडकरी यांचा आशीर्वाद आहेच, पण देव आणि देवेंद्र यांचाही मला आशीर्वाद लाभला आहे. कारखाना सुरू करताना अनेक अडचणी आल्या, पण निळकंठेश्वराच्या कृपेने त्या दूर झाल्या. पहिल्या साखरेचे पोते मंदिरात अर्पण करून दंडवत घालणार आहे. या हंगामात प्रती टन ऊस ३०११ रुपयांचा भाव दिला जाणार आहे. बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनासह व सरकारच्या पाठबळामुळे किल्लारीतील निळकंठेश्वर साखर कारखाना नव्या जोमाने उभा राहिला असल्याचे सांगितले.