Latur Pattern NEET Result 2026 Pudhari
लातूर

NEET 2026: NEET मध्ये पुन्हा 'लातूर पॅटर्न'चा डंका! एकट्या शाहूचे 450, जिल्ह्यातून 1,200 हून अधिक विद्यार्थी होणार डॉक्टर

Latur Pattern NEET Result: नीट 2026 च्या निकालात लातूर पॅटर्नने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत दमदार कामगिरी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Latur Pattern NEET Result 2026: देशभरात नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या चर्चांनी वातावरण ढवळून निघाले असताना, लातूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुन्हा एकदा 'लातूर पॅटर्न'ची ताकद सिद्ध केली आहे. यंदाच्या निकालात लातूरमधील विविध शिक्षण संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अभ्यास, शिस्त आणि सातत्यपूर्ण तयारीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे दाखवून दिले आहे.

विशेष म्हणजे, राजर्षी शाहू महाविद्यालयातील तब्बल 450 हून अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातून 1,200 ते 1,500 हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवू शकतात, असा प्राथमिक अंदाज शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.

राजर्षी शाहू महाविद्यालयाची दमदार कामगिरी

यंदा राजर्षी शाहू महाविद्यालयातील सुमारे 1,400 विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 600 विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाले असून, 46 हून अधिक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

तसेच 530 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या माहितीनुसार, अद्याप 800 विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण बाकी असल्याने जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एकट्या शाहूची नव्हे, संपूर्ण लातूरची यशोगाथा

यंदाच्या NEET निकालात केवळ राजर्षी शाहू महाविद्यालयच नव्हे, तर दयानंद विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, बसवेश्वर महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय यांसारख्या संस्थांतील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यामुळे लातूरची शैक्षणिक परंपरा आणि स्पर्धा परीक्षांमधील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पेपरफुटीच्या वादाला निकालातून उत्तर

गेल्या काही महिन्यांपासून नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी लातूरच्या शिक्षण पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यंदाच्या निकालाने त्या सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे.

विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास, कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे 'लातूर पॅटर्न' हा केवळ कोचिंगचा नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियोजन आणि मेहनतीचा ब्रँड असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT