National Highway 361 has become a risky highway
बेलकुंड, पुढारी वृत्तसेवाः रत्नागिरीनागपूर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर औसा तुळजापूर दरम्यान प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. सुमारे ५३ किलोमीटरच्या या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक आणि वाहनचालकांना चिखल, अंधार आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो वाहने या महामार्गावरून धावतात, मात्र सुविधांचा बोजवारा उडाल्याने या मार्गाला "जोखीम महामार्ग" असे नावच पडले आहे.
महामार्गाच्या कडेला पावसामुळे व रस्त्याच्या देखभालीअभावी मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. काही ठिकाणी तर हा चिखल रस्त्यावर आल्याने वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था वाढत चालली असून कोणताही तातडीचा उपाय केला जात नाही. याशिवाय, अनेक गावांमधील उड्डाणपुलांच्या खालून जाणाऱ्या मार्गांमध्ये कायमच अंधार पसर-लेला असतो. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने हे बोगदे काळोखात बुडालेले असतात. परिणामी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना भीतीचे वातावरण निर्माण होते.
प्रकाशयोजनेअभावी अनेक वेळा वाहनांची टक्कर होण्याचे प्रसंग घडतात. स्थानिक नागरिकांच्या मते, प्राधिकरणाकडून दिवे दुरुस्त करण्याची कोणतीही नियमित देखभाल केली जात नाही. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून टोल आकारला जातो, परंतु त्याबदल्यात मूलभूत सुविधा मिळत नाहीत, ही वाहनचालकांची सर्वात मोठी तक्रार आहे. महामार्गालगत असलेल्या अनेक बसस्थानकांची अवस्था अत्यंत दयनीय असून, घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रवाशांना बसण्यासाठी स्वच्छ जागा नाही, पावसाळ्यात पाणी साचते, आणि डास-माशांचा त्रास वाढतो.
याशिवाय, उड्डाणपुलावरील दिवे वारंवार बंद पडतात. त्यामुळे पुलावरही अंधार असतो. रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच मार्गावर असलेल्या सीएनजी पंपांवरही परिस्थिती बिकट आहे. वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा थेट महामार्गावरलागतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढते.