

Chemical fertilizer prices increased
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. रब्बीच्या पेरण्या दुबार कराव्या लागल्या, महागामोलाची खते व बियाणे वाया गेली. त्यात आता रासायनिक खतांच्या किमती २०० ते २५० रुपये प्रति बँग वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नव्यानेच आर्थिक संकट उभे राहिले आहे. गेल्या वर्षभरात ज्वारीसह इतर सर्वच धान्यांचा भाव स्थीर राहिल्यामुळे व पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात आता खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करावी की नाही असा प्रश्न पडला आहे.
रेणापूर तालुक्यात अतिवृतीमुळे सोयाबीनसह खरीपाची पीके वाया गेली. रेणा व मांजरा नदी काठच्या शेकडो शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला अनेकांचे सोयाबीन नदीच्या पुरात वाहून गेले. आजही कांही शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी साचुन आहे. वेळेवर रब्बीची पेरणी करावी म्हणुन कांहीं शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, तर काहींच्या वापसा नसल्यामुळे होऊ शकल्या नाहीत.
ज्यांनी ज्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांना दुबार पेरणी करावी लागली. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गीक आपत्तीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे खर्च अधिक व उत्पादन कमी अशी स्थिती निर्माण होत आहे. कर्जाचा बोजा वाढत चालल्याने शेतकरी अधिकच कर्जबाजारी होत आहे.
नदीकाठच्या बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याने खरडुन गेल्या आहेत. त्यांना रब्बीची पेरणी करणे शक्य नाही. खरीपही गेले आणि रब्बीही गेली अशी अवस्था झाली आहे. अगोदरच खते, बियाणे व किटक नाशक औषधांच्या किमती वाढल्या असतांनाच आता परत एकदा खतांच्या एका गोणीमागे २०० ते २५० रुपयांने खतांच्या किंमती वाढल्या आहेत.
दुबार - तिबार पेरणीचे संकट उभे असतांनाच खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकप्रतिधिना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सध्या तरी वेळ नाही. एकीकडे खते, बीयाणे व औषधांच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. तर दुसरीकडे शेतमालाचे भाव कमी अधिक होत आहेत. शासनाने कांही धान्यांचा हमी भाव जाहीर केला परंतु बाजारात तसा भाव मिळत नाही.
दर वर्षी खरीप व रब्बी हंगामात मिश्र व रासायनिक खतांना मोठी मागणी असते, दरवर्षी खतांची मागणी वाढतच आहे. हि बाब लक्षात घेऊन खत कंपन्यांनी खतांच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. ९:२४:२४ - १९०० वरून २१०० तर पोटॅश १८०० वरून २००० रुपये प्रति बॅगप्रमाणे आहेत. केंद्र सरकारने १ नोहेंबरपासून खतांच्या किमती २०० ते २५० रुपयांनी वाढविल्या आहेत.