तांदुळजा (लातूर) : शिवाजी गायकवाड
मुरुड -तांदुळजा-अंबाजोगाई हा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खोदलेल्या खड्ड्यामुळे तो मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित विभागाने केवळ थातूरमातूर दुरुस्ती केल्याने या रस्त्यावरून वाहन चालकांना व विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. उखडलेले डांबर,अरुंद वळण यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. .ह्या रस्त्यावरील पडलेले खड्डे न बुजवल्याने तसेच दिशादर्शक फलक व सूचनाफलक न लावल्यामुळे जर एखादा भयंकर अपघात झाला तर सदर अपघाताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल वाहनधारकांकडून होत आहे. वारंवार तक्रारी असूनही या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण किंवा मजबुतीकरणाचे कोणतेही नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त मलमपट्टी करून कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याची खंत प्रवाशातून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बांधकाम विभागाने अलीकडेच काही ठिकाणी खड्डे भरले पण केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आली. वाहतुकीने व पावसाने रस्ता दुरुस्तीचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे.त्यामुळे वाहनधारकांना वेग कमी करून व समोरील रस्त्यातील खड्ड्यांना चुकवून प्रवास करण्याची सवय जडवून घ्यावी लागत आहे. सध्या तांदूळजा ते अंबाजोगाई मार्गावरील तांदूळजा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील वळण रस्त्यावर पडलेला तो खड्डा चर्चेचा विषय ठरला आहे. या खड्ड्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने सदर खड्डा विना विलंब बुजवावा अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी काही दिवसानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर हा खड्डा खचून मोठा होण्याची शक्यचा आहे. सध्या या खड्ड्यामध्ये दगड टाकून गावकर्यांनी रस्त्याची व खड्ड्याची पोकळी भरण्याचे काम केले आहे.
अंबाजोगाईकडून येणार्या वाहन धारकाला वळण असल्याकारणाने हा खड्डा दिसत नाही तसेच त्या शेजारी नाल्याचा अरुंद पूल असल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत रात्री या मार्गावर कधी उजाड तर कधी अंधार असल्याने या खड्ड्यामुळे व अरुंद पुलामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तांदुळजा ते मुरुड मार्गावर जैन दिगंबर मंदिरापासून काही अंतरावर पावसाचे पाणी वाहून जाऊन तेथीलही रस्ता खचून गेला असल्यामुळे सध्या प्रवाशांना या खचलेल्या रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे.