Municipal Corporation's campaign to make Khadgaon Road in Latur encroachment-free
लातूर, पुढारी वृत्तसेवा : हा नेहमी नागरिकांनी गजबजलेला व वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीस अडथळे येत असलेला शहरातील दयानंद गेट ते खाडगाव रोड महापालिकेच्या पथकाने गुरुवारी सकाळपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणमुक्त केला. या रस्त्यावरील जवळपास चाळीस अतिक्रमणे काढण्यात आली.
दयानंद गेट ते खाडगाव रोडवर सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची प्रचंड रेलचेल व नागरिकांची वर्दळ असते. या रोडवर दयानंद शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. त्यामुळे दयानंद गेटपासून ते खाडगाव रोडवर उतारापर्यंत दोन्ही बाजूंनी पुरस्कांच्या दुकानांसह खानावळी, हॉटेल्स, इतर दुकाने, झेरॉक्स आदी आस्थापनांनी दुकानांसमोर अँगल ठोकून अतिक्रमण केलेले होते. त्यात गेल्या काही महिन्यांपासून या रोडवर दुतर्फा भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते वसत आहेत.
सोबतीला फळविक्रेत्यांचे हातगाडेही आहेत. त्यामुळे खाडगाव रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अशा गर्दीतून काही टवाळखोर पोट्टे मोटारसायकल भरधाव पळवत असल्यामुळे अपघात होत आहेत व अपघातानंतर सामान्य नागरिकांनाच उद्धट बोलत आहेत.
त्यामुळे नागरिक परेशान आहेत. दरम्यान, आज गुरुवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शिवाजीनगर पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबी लावून रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत जवळपास चाळीस अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला होता. अतिक्रमण काढतेवेळी महापालिकेचे ए झोनप्रमुख बंडू किसवे, अतिक्रमण प्रमुख रवी कांबळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर व त्यांचे पोलिस कर्मचारी हजर होते.