Chapoli student complaint MSRTC
संग्राम वाघमारे
चाकूर : चापोली येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी रुद्राक्ष लक्ष्मण पेटकर याने केलेल्या छोट्याशा तक्रारीने अखेर राज्य परिवहन मंडळाचे प्रशासन हादरले. एस.टी. चालकाने चापोली गावात न थांबवता विद्यार्थ्याला थेट उड्डाणपुलावर उतरविल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी साडेचार वाजता घडली.
या घटनेची तक्रार रुद्राक्षने थेट राज्य परिवहन मंडळाकडे केली. विद्यार्थ्याच्या तक्रारीची परिवहन प्रशासनाने गंभीर दखल घेत, संबंधित आगार व्यवस्थापकांना उड्डाणपुलावरून बस नेऊ नये आणि सर्व्हिस रोडचा वापर करून प्रवाशांना गावातच योग्य ठिकाणी उतरवावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे चापोलीसह परिसरातील प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
घटनेनंतर लातूर विभाग नियंत्रकांनी तत्काळ कार्यवाही करत लातूर, अहमदपूर, निलंगा, उदगीर व औसा येथील आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवले. या पत्रात लातूर–अहमदपूर मार्गावरील चापोली येथील उड्डाणपुलाचा वापर थांबवावा आणि सर्व्हिस रोडने बस ने-आण करावी, अशी सूचना देण्यात आली.
तसेच मंगळवेढा आगाराची बस असल्यामुळे लातूर विभाग नियंत्रकांनी सोलापूर विभाग नियंत्रकाला देखील पत्र पाठवून घटनेची माहिती देऊन कार्यवाहीची मागणी केली. त्यानंतर नांदेड विभाग नियंत्रकांनी १३ नोव्हेंबर रोजी सर्व आगारांना निर्देश जारी करून चापोली उड्डाणपुलावर बस न थांबविण्याचे आदेश दिले आणि प्रवाशांना गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे सांगितले.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यापुढे चापोली उड्डाणपुलावर प्रवाशांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. रुद्राक्ष पेटकरच्या तक्रारीमुळे केवळ त्याच्याच नव्हे, तर चापोली व परिसरातील सर्व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गावकऱ्यांनी या त्वरित आणि संवेदनशील निर्णयाबद्दल राज्य परिवहन मंडळाचे आभार मानले, तसेच रुद्राक्षने दाखविलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. चापोली व परिसरातील नागरिकांनी राज्य परिवहन मंडळाच्या तातडीच्या आणि संवेदनशील निर्णयाचे स्वागत केले. एका मुलाच्या धैर्याने प्रशासन जागे झाले, अशी भावना व्यक्त केली आहे.