

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली असून एकूण ७० जागांपैकी तब्बल ५० जागा २०१७ च्या आर क्षणानुसार कायम राहिल्या, तर २० जागांवरील आरक्षण बदलले आहे.
या आरक्षण बदलाचा फटका कॉंग्रेससह भाजपा या दोन्ही राजकीय पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांना बसला आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांना आता लढण्याचा मतदारसंघ कोणता? याची चाचणी करता येणार आहे, तर अनेकांना सोयीचे आरक्षण न पडल्याने अन्य मतदार संघ शोधावा लागणार आहे. लातूर महापालिकेत २०१७सालच्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे २०२५ ची निवडणूकही ৩০ सदस्यांसाठी एकूण १८ प्रभागांमध्ये होणार आहे. मंगळवारी प्रभागांचे आरक्षण काढल्यानंतर निवडणूक कुठून लढायची हे चित्र स्पष्ट झाले.
५० जागांवरील आरक्षण कायम राहिले आहे. त्यामुळे भाजपा सह काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना आहे त्याच प्रभागातून उभे राहता येणार आहे. मात्र त्यातील किती उमेदवारांना पक्ष संधी देईल ते येणाऱ्या काळात पहावी लागणार आहे. आरक्षण कायम राहिलेल्या मतदारसंघात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माझी उपमहापौर कैलास कांबळे यांच्यासह माजी सभापती बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, सचिन मस्के, सचिन बंडापल्ले, अहमद खान पठाण, गौरव काथवटे, दीप्ती खंडागळे, रेहाना बासले या दिगजांसह इतरांचे आरक्षण कायम राहिले आहे. तसेच भाजपाचे माजी उपमहापौर शैलेश गोजामुंडे, माजी नगरसेवक तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी नगरसेवक सुनील मलवाड, अजय कोकाटे, शैलेश स्वामी, जानवी सूर्यवंशी, शोभा पाटील, हनुमान जाकते, संजय रंदाळे, वर्षा कुलकर्णी, देवानंद साळुंखे, विशाल जाधव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष राजासाब मणियार यांचे आरक्षण कायम राहिले आहे.
आरक्षण बदलामुळे भाजपाचे माजी उपमहापौर देविदास काळे, भाजपच्या ज्योती आवासकर, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सपना किसवे, काँग्रेसचे अशोक गोविंदपुरकर, माझे महापौर दीपक सुळ, भाजपाच्या दीपाताई गीते, काँग्रेसचे अयुब मणियार, तसेच माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनाही आर-क्षणाचा फटका बसला आहे. आरक्षण बदलले गेल्यामुळे संबंधितांना आपल्या कुटुंबीयांना अथवा नातेवाईकांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे.