गावकऱ्यांनी वानरावर केले अंत्यसंस्कार
गावातून हरिनामाच्या गजरात वानराची वाजत गाजत अंत्ययात्रा
गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी खरेदी केले नवीन कापड टोपी
तांदूळजा (लातूर) : शिवाजी गायकवाड
लातूर तालुक्यातील तांदूळजा येथे मंगळवारी (दि.२२) मरण पावलेल्या वानरावर गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. तत्पूर्वी त्या वानराची वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली.
तांदुळजा येथील जगदीश गायकवाड यांच्या शेतात काही दिवसांपासून वानराची नर आणि मादी अशी जोडी वास्तव करीत होती. त्या जोडीपैकी एक वानराचा मृत्यू झाला व गावकऱ्यांना हे कळताच त्यांना गायकवाड यांच्या शेताकडे धाव घेतली. वानराचा अंत्यसंस्कार करण्याचे त्यांनी ठरवले. नवीन कापड टोपी आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले.
ट्रॅक्टर सजवून संपूर्ण गावातून हरिनामाच्या गजरात वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील भजनी मंडळ व महिला भगिनीसह हिंदू मुस्लिम लहानथोर सर्वजण या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अतिशय दुःखद वातावरणामध्ये वानरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील जनक गायकवाड, बालाजी झारे, नवनाथ कदम, सुखदेव माकुडे, बिभीषण गायकवाड, संदिपान काकडे, कमलाकर गायकवाड कृष्णा गणगे, बिभीषण गणगे, अंकुश जाधव, दिनेश बावणे, खंडू गायकवाड, ओम गणगे, लिंबराज गायकवाड, राम मोहिते, काकासाहेब गायकवाड, उत्तरेश्वर गायकवाड, बलभीम बावणे, राजाभाऊ जाधव व तरुण तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.