चाकूर : मनरेगा कामांमध्ये ५१ लाख ६७ हजार ४६२ रुपयांच्या अनियमितता व गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी कलकोटी, बावलगाव आणि अजनसोंडा बुद्रुक येथील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
संबंधितांवर कारवाई न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
कलकोटी, बावलगाव आणि अजनसोंडा बुद्रुक या गावांतील मनरेगा कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणात ५१ लाख ६७ हजार ४६२ रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी नागरिकांकडून जानेवारी २०२६ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मात्र, अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, १ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कागदपत्रे व मनरेगा कामांची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कारवाई न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देणाऱ्यांमध्ये कलकोटी येथील दयानंद मुर्के, लक्ष्मण कोंपले, मधुकर कोंपले, बावलगाव येथील रमाकांत कांबळे, अमोल कलवले, तसेच अजनसोंडा बु. येथील पंढरी हादवे, सुरेश कांबळे आणि तुकाराम कोरके यांचा समावेश आहे.
या आरोपांची प्रशासनाकडून चौकशी होऊन नेमके तथ्य काय समोर येते आणि संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.