Meeting of the Sugarcane Struggle Committee; MNS, Prahar, and other farmers' organizations warn of agitation
लातूर पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ऊस संघर्ष समितीची बैठक लातूर येथे पार पडली. मांजरा, जागृती, दूँटीवन यांसह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना आणि विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
साखर कारखान्यांच्या कामकाजातील पारदर्शकता आणि वजन काट्यांचा प्रश्न बैठकीत प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. साखर आयुक्तांच्या परिपत्रकानुसार गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी तसेच हंगाम सुरू असताना वजन काट्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. ऊस वजनात काटागिरी होऊ नये आणि शेतकऱ्यांना वजनाची अचूक नोंद तत्काळ मिळावी, यासाठी प्रशासनाने भरारी पथकांच्या माध्यमातून नियमित तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
खासगी वाहन काटे तसेच कारखान्यांतील वजन काटे वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित असतानाही वजन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव किंवा अनुचित प्रकार आढळल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे संघटनांनी निदर्शनास आणले.
वजन काट्यांमधील लोडसेल, जंक्शन बॉक्स, इंडिकेटरपर्यंतच्या केबल्स अखंड असाव्यात, कोणतेही छुपे उपकरण नसावे, संगणक प्रणाली कार्यान्वित असावी आणि शेतकऱ्यांना सही-शिक्क्यासह छापील वजन पावती मिळावी, या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि साखर कारखान्यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला.