मसलगा सिंचन प्रकल्पाची पाहणी करताना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर Pudhari Photo
लातूर

Maslaga Irrigation Project | मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे

पुढारी वृत्तसेवा

निलंगा : मसलगा सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला भेग पडल्यामुळे ही भिंत खचली आहे. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. तांत्रिक बाबींच्या तपासणीनुसार या भिंतीची बांधणी नव्याने करावे लागण्याची शक्यता असून याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

निलंगा तालुक्यातील मसलगा सिंचन प्रकल्पाच्या खचलेल्या भिंतीची पालकमंत्री श्री. भोसले यांनी पाहणी केली. तसेच या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक तथा अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या महिन्यात लातूर जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचा विषय त्यांच्याकडे मांडला होता. या प्रकल्पाच्या दुरुस्तीला तातडीने मान्यता देण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करून याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पुढील पावसाळ्यात या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रकल्पाची भिंत खचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे यांनी प्रकल्पाच्या दुरुस्ती प्रस्तावाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

पालकमंत्री राजे भोसले यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रकल्पाची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT