Laturkars' emotional farewell to Bappa
लातूर, पुढारी वृतसेवा : ढोल ताशांचा गजर , गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा घोष, संगिताच्या तालावर ठेका धरलेले लहान-थोर, विविध देखावे अशा उत्साही वातावरणात शनिवारी (दि. ६) लातुरकरांना आपल्या बाप्पांना निरोप दिला.
लातूरात दुपार पासुनच विर्सजनाला सुरुवात झाली होती. घरगुती तसेच छोट्या मंडळांचे गणपतीचे विसर्जन शहरा शेजारी असलेल्या जलाशयात होत होते. यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने जलाशयांना चांगले पाणी आहे. प्रारंभी मानाच्या भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाच्या आजोबा गणपतीची आरती करून दुपारी एक वाजताविसर्जन मिरवणुकीस प्रारंभझाला. सर्वात शेवटी औसा हनुमान गणेश मंडळाचे प्रस्थान झाले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजा गणपती, महाराजा गणपती तसेच अन्य गणेश मंडळांच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.
चौकात तोबा गर्दी झाली होती. गणेशांच्या भव्य मूर्ती, सजावट, ढोल पथके सर्वांचे लक्ष वेधत होती. मिरवणुकांत तरुणाईंचा मोठा सहभाग होता. ढोलपथके, प्रबोधनाचे देखावे, ठेका धरलेली तरुणाई लक्ष वेधत होती. अनेक गणेश मंडळांनी धार्मीक, पौराणीक देखावे साकारले होते. या मिरवणुका पाहण्यासाठी नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. अनेक राजकीय पक्ष संघटनांनी स्वागत मंच उभारले होते.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणूकीचे लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने स्वागत करून गणेश मंडळांच्या पदाधिकाजयांचा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सत्कार केला. गोलाई परिसरात उभारण्यात आलेल्या शहर भाजपाच्या स्वागत व्यासपीठाने लातूरकरांसह गणेश भक्तांचेही लक्ष वेधून घेतले होते. विलासराव देशमुख युवा मंचच्या स्वागत कक्षात शहरातील विविध गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे व मान्यवरांनी उत्कृष्ट देखावे तसेच सादरीकरण करणाऱ्या गणेश मंडळाचा सत्कार केला. शहरात मनपाने गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली होती. मिरवणूक मार्ग व विसर्जनस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जल प्रदूषण टाळण्यासाठी मनपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या गणेश मूर्ती संकलन उपक्रमा अंतर्गत लातूर शहरातून सुमारे १७ हजार ६६३ हजार गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. निर्माल्य संकलन कलशामध्ये गणेशभक्तांनी ४ हजार ३२० किलो निर्माल्याचे दान केले. या निर्माल्या पासून खत निर्मिती केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. पालिकेने यावर्षी शहरात १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. त्यासाठी जवळपास ४०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले होते.
ध्वनी प्रदूषणाने होणारी हानी आणि त्रास टाळण्यासाठी पारंपारिक वाद्यांना पसंती द्यावी व मिरवणुका काढाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गणेश मंडळांना केले होते. लातूरातील गणेश मंडळांनी प्रशासनाच्या या हाकेला प्रतिसाद दिला डॉल्बील फाटा देत त्यांनी पारंपारिक वाद्यांना स्वीकारून गणेश विसर्जन मिरवणूक पर्यावरणानुकुल केली.