जावेद शेख
उदगीर : तालुक्यातील चोंडी ते चोंडी तांड्यादरम्यान रस्त्याअभावी नागरिकांचे मोठे हाल होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे घोषित झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचा इशारा नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे बुधवारी (14 जानेवारी) तहसीलदार उदगीर राम बोरगावकर यांना देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चोंडी ते चोंडी तांडा हा शेतकऱ्यांच्या वादात असलेला रस्ता तहसीलदार उदगीर यांच्या मदतीने गेल्या वर्षी दोन्ही शेतकऱ्यांच्या सहमतीने खुला करून दिला होता. तसेच त्या रस्त्याची दुर्दशा स्वतः तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांना पावसाळ्यात तर नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात या गावाचा इतर गावांपासून संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते.
हे गाव विकासापासून कोसो दूर राहिल्याने निवडणूकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना फिरकू देणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर माजी सरपंच बाबू पवार, किशन पवार, परशुराम पवार, गोविंद पवार यांच्यासह दीडशे ते दोनशे नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांनी माजी आमदार सुधाकर भालेराव यांना व माजी मंत्री आमदार संजय बनसोडे बनसोडे यांना अनेकवेळा निवेदन देऊनही काहीही न्याय मिळाला नाही. त्यामुळे तांडावासीयांनी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थी शिक्षणापासून अन् तरुण विवाहापासून वंचित !
भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरीपण या तांड्याला न्याय मिळाला नाही. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी व गरोदर स्त्रिया तसेच ज्येष्ठ नागरिक यांना दळणवळण करण्यासाठी खूप त्रास होत आहे. पावसाळ्यात तर तांडा व गाव यांच्यामध्ये नदी असल्यामुळे 2 ते 3 महिने संपर्क होत नाही. त्यामुळे तांड्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. तसेच तांड्यातील तरुणांना मुलगी देण्यास पाहुणे रस्ता नसल्याकारणाने टाळाटाळ करत आहेत.