लातूर जिल्हा परिषद राजकारणाची पावरहाऊस pudhari photo
लातूर

Latur Zilla Parishad Election : लातूर जिल्हा परिषद राजकारणाची पावरहाऊस

एका खासदारासह दिले सहा आमदार; लोकनेते विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे लाभले मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

बालाजी फड

लातूर : उस्मानाबाद जिल्ह्याचे 1982 मध्ये विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या लातूर जिल्हा परिषदेला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात या जिल्हा परिषदेने एका खासदारासह सहा आमदार दिले आहेत. सात आमदारांपैकी तीन आमदार मंत्री राहिले आहेत. यात विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचाही समावेश आहे. लातूर जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर लागली आहे.

1982 साली स्वतंत्र लातूर जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर या जिल्हा परिषदेला राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख, दुसरे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह लातूर जिल्ह्यांत समावेश असलेल्या तत्कालीन रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व केलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा परिषदेने कारभार केला आहे.

लातूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख विराजमान झाले होते. दिलीपरावांनी सुसंस्कृत राजकारणाची घालून दिलेली परंपरा आजही या संस्थेचे लोकप्रतिनिधी चालवत आहेत. राजकारणात दिलीपराव देशमुख यांनी राज्याचे विविध खात्यांचे मंत्री म्हणून काही वर्षे कारभार सांभाळला आहे.

आताचे राज्याचे सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पहिल्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले विनायकराव पाटील, उदगीर तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गोविंद केंद्रे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले भाजपचे सुधाकर शृंगारे 2017 मध्ये वडवळ नागनाथ गटातून जिल्हा परिषद सदस्य होते.

रेणापूर तालुक्यातील काँग्रेसचे तत्कालीन जि. प. सदस्य राहिलेले ॲड. त्र्यंबक भिसे हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यांच्यानंतर 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख 2019 मध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार झाले होते. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविलेल्या या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली नावारूपाला आलेल्या लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT