

परतूर ः मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव दिल्यामुळे आपल्या विद्यापीठाची उंची वाढली आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेले शैक्षणिक कार्य म्हणजे पाठीमागे राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आहे ते पूर्णत्वाला नेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन डॉ. यशवंत दुबाले यांनी केले.
येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय व आजीवन शिक्षण विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवी प्रधान, डॉ. सखाराम टकले, डॉ. शैलेंद्र शेलार,प्रा. अशोक पाठक यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ . दुबाले म्हणाले, राष्ट्र निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण सर्व गोष्टींचा पाया आहे. शिक्षणाअभावी माणसाचे, समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. गुलामगिरी येण्यात आणि असण्यात एकमेव कारण म्हणजे अज्ञान होय. मराठवाड्याची शिक्षणाची भूक ही मोठी आहे. हे बाबासाहेबांनी ओळखले होते. या भागाला एका विद्यापीठाची गरज आहे हे बाबासाहेबांनी प्रथम पाहिलेले स्वप्न होते. परंतु त्यांचे नाव देण्यासाठी झालेला विरोध हे आपले दुर्दैव आहे.
विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करून पुढे जावे. बाबासाहेबांचा विचार आपणास नेहमीच प्रेरणा देत जाईल असेही शेवटी म्हणाले. उपप्राचार्य डॉ. रवी प्रधान यांनी नामांतराच्या लढ्याचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सखाराम टकले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राघो गायकवाड यांनी केले. आभार प्रा.अशोक पाठक यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती.