लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मिना यांनी नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षांचे स्वागत केले. pudhari photo
लातूर

Latur Zilla Parishad : लातूरच्या मिनी मंत्रालयावर महायुतीची सरशी

अध्यक्षपदी भाजपाच्या उषा पाटील, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे विजयी

पुढारी वृत्तसेवा

लातूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाबाबंत गेली अनेक दिवसांपासून संबध जिल्ह्याला लागलेली उत्सुकता सोमवारी (दि.16) दुपारी शमली. लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी महायुतीच्या (भाजप) उषाबाई संभाजी पाटील तळेगावकर तर उपाध्यक्षपदी महायुतीचेच (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) दयानंद दामोदर सुरवसे हे निवडून आले.

महायुतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारास प्रत्येकी 34 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या दोन्ही पदाच्या उमेदवारास प्रत्येकी 25 मते मिळाली. हात उंचावून मतदान झाले.या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून जल्लोष केला.

सोमवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेशअप्पा कराड भाजप प्रदेश उपाध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी भाजपच्या उषा तळेगावकर तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर या होत्या. त्यांना उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखडे यांनी सहकार्य केले. अध्यक्षपदासाठी महायुतीकडून उषाबाई संभाजी पाटील तर महाविकास आघाडीकडून दीपाली शामराव भोसले, मानसी मरूरे, राजश्री देशमुख असे चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

उपाध्यक्ष पदासाठी दयानंद दामोदर सुरवसे हे महायुतीचे उमेदवार तर नागेश्वरी सचिन केंद्रे, अश्विनी शिंदे, मुकेश भालेराव हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. छाननीनंतर महाविकास आघाडीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी प्रत्येकी दोघांनी माघार घेतली त्यानंतर अध्यक्षपदी महायुतीच्या उषाबाई संभाजी पाटील व महाविकास आघाडीच्या दीपाली शामराव भोसले यांच्यात लढत झाली.

यात उषा पाटील यांना 34 तर दीपाली भोसले यांना 25 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत महायुतीच्या दयानंद सुरवसे यांना 34 तर महाआघाडीच्या नागेश्वरी केंद्रे यांना 25 मते पडली. हात उंचावून मतदान झाले. या निवडीनंतर अध्यक्ष- उपाध्यक्षांनी पदभार स्वरकारला. यावेळी जिल्हा परिषद परिसरात पोलिस उपनिरीक्षक तानाजी पाटील व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवणी, चाकूर तालुक्यांना दुसऱ्यांदा मान

उषाबाई संभाजी पाटील तळेगावकर या देवणी तालुक्यातील तळगेवाच्या रहिवासी असून त्या सहकार महर्षी दिवंगत रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या स्नुषा आहेत. त्या प्रथमच जि. प. वलांडी गटातून निवडून आल्या आहेत. त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा त्यांच्यासाठी जमेचा ठरणार आहे. महिला तसेच सर्वसामान्याचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, महिला बचत गट आदींवर आपण लक्ष केद्रीत करणार असून विकासाचा वेग गतिमान करणार असल्याचे उषाबाई तळेगावकर यांनी सांगितले.

उषाबाई तळगेवाकर या लातूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या रूपात देवणी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. लातूरच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून याचा तालुक्यातील साहेरा मिर्झा यांना मान मिळाला होता.

उपाध्यक्षपदी निवडून आलेले दयानंद सुरवसे हे चाकूर तालुक्यातील झरी नवकुंडचे रहिवासी असून जानवळ जिल्हा परिषद गटातून ते ( राष्ट्रवादी अजित पवार गट) निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नीही याच गटातून पूर्वी निवडून आल्या होत्या. सुरवसे हे अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना लोकप्रश्नांची जाण आहे. ते राज्याचे सहकार मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या रुपात पहिल्यांदाच धनगर समाजाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून चाकूर तालुक्याला दुसऱ्यांदा हा मान मिळाला आहे.

यापूर्वी वडवळ (ना.) येथील अण्णासाहेब पाटील यांना हा मान मिळाला होता. सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडवणे तसेच विकास गतिमान करणे व नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवणे ही आपल्या कार्याची दिशा असेल असे सुरवसे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT