Latur Zilla Parishad pudhari photo
लातूर

Latur Crime : अध्यक्षांच्या निवासस्थानातील चोरीवरून जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली

सदस्य संतप्त; जबाबदार अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

लातूर : जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी झालेल्या चोरीच्या घटनेवरून मंगळवारी झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. उपमंत्र्याचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीची सुविधा नसल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत, यासाठी जबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी केली.

अध्यक्षांच्या निवासस्थानी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नव्हता. तसेच सीसीटीव्ही बसविण्याबाबत सांगूनही प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. या दोन्ही सुविधा उपलब्ध असत्या तर चोरीची घटना टळली असती किंवा चोरी झालीच असती तरी सीसीटीव्हीच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले असते, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी चौकशी समिती नियुक्त करण्यात येईल. समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर ११ विषय होते. मात्र, सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीचा मुद्दाच सभेत केंद्रस्थानी राहिला. त्यानंतर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत सभा सुरू राहणार होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT