Latur will be made a water safe competent district: Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosale
लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच लातूरला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम जिल्हा बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.
समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणे ही आपली जबाबदारी आहे. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला असून, २१ ऑगस्ट रोजी 'महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर' मोहीम राबविण्यात येणार आहे.
युवा, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी मोहिमेच्या लोगोचे अनावरण करून उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, उद्योग, रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने १२९ किलोमीटर लांबीच्या पाच प्रमुख रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच लातूर येथे सहकार भवन उभारण्यात येत आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून १२ हजार ६४८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १८ कोटी २९ लाख रुपये, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून ४ हजार ३५७विद्यार्थ्यांना १२ कोटी २९ लाख रुपयांचा थेट लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांत ३७ हजार ७५८ लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ, दाखले आणि सेवांचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक मोहन ठोंबरे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
युवकांनी तंत्रज्ञानात पुढे यावे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे जगातील कामकाज वेगाने बदलत आहे. त्यामुळे युवकांनी तंत्रज्ञान, माहिती, सायबर सुरक्षा, आधुनिक शेती आणि नवउद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे यावे. लातूरच्या तरुणाईने कौशल्य व तंत्रज्ञानाची सांगड घालून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री भोसले यांनी केले.
५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यापैकी २२ हजार २६३ शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच निधी देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून गतवर्षी ४ हजार २०० शेतकऱ्यांना १० कोटी १५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.