Latur News : अपघातग्रस्त विद्यार्थिनीच्या मदतीला धावल्या स्वयंसेविका file photo
लातूर

Latur News : अपघातग्रस्त विद्यार्थिनीच्या मदतीला धावल्या स्वयंसेविका

राजीव गांधी चौकातील घटना; प्रसंगावधान राखून जखमीला केले रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

Latur Volunteers rushed to help the accident-affected student

लातूर, पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी लातूर-औसा मार्गावरील राजीव गांधी चौक परिसरात टेम्पोने शाहू महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला धडक दिली. या अपघातात विद्यार्थिनी जखमी होऊन रस्त्यावर पडली. अपघाताची घटना दिसताच दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेविकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

आरती जाधव, श्रद्धा जाधव, वैष्णवी जाधव, प्रा. योगेश शर्मा तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. अजित चिखलीकर यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने तिचा रक्तस्त्राव थांबविण्यात आला असून, सध्या तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे.

गणपती विसर्जनामुळे राजीव गांधी चौक परिसरात मोठी वर्दळ असतानाच हा अपघात झाला. जखमी विद्यार्थिनी रस्त्यावर पडलेली पाहून स्वयंसेविकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने मदतकार्य सुरू केले.

सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करून तिला आवश्यक उपचार मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. संकटसमयी मदतीचा हात पुढे करीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या प्रसंगावधान, धाडस आणि सामाजिक बांधिलकीचे महाविद्यालय परिसरातून कौतुक होत आहे.

मी नाही, तुम्ही'चा सेवाभाव प्रत्यक्षात

अपघातग्रस्त विद्यार्थिनीला रस्त्यावर जखमी अवस्थेत पाहताच स्वयंसेविकांनी वेळ न दवडता मदतीसाठी पुढाकार घेतला. जखमीला वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार मिळवून देणे, हे त्यांच्या प्रसंगावधानाचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या 'मी नाही, तुम्ही' या सेवाभावनेचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारे हे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी आहे, असे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT