Woman Assaulted Udgir Latur
उदगीर : शहरातील भाजी मार्केट परिसरात भाजी विक्री करणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. २६) रात्री सुमारे ८.३० वाजता उदगीर शहरातील भाजी मार्केट परिसरात, पत्तेवार मेडिकलजवळ घडली. फिर्यादी पूजा लक्ष्मण कांबळे (वय २६, रा. फुलेनगर, उदगीर) यांच्या भावाला “गाडीवर का बसलास” या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी वाद घालून शिवीगाळ सुरू केली.
वाद वाढल्यानंतर फिर्यादी पूजा कांबळे आणि त्यांचे पती मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत आरोपींनी छत्रीच्या दांड्याचा तसेच फरशीच्या तुकड्याचा वापर करून मारहाण केल्याने फिर्यादी व त्यांचे पती जखमी झाले.
या प्रकरणी चौघांविरुद्ध उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अक्रम हैदर शेख, शेख मुक्तदिर शेख चाँद, आसिफ नबीसाब मोमीन आणि जाकेरखान हुसेन पठाण यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.